नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कमीत-कमी शब्दांत जोरदार हल्लाबोल चढवला आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या आचरणातून सर्वांसमोर चांगले उदाहरण प्रस्थापित केले पाहिजे. त्यांची वागणूक पंतप्रधानपदाच्या नैतिकतेला अनुरुप असायला हवी', असा सल्ला मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान मोदींना दिला आहे.
माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांच्या ‘फेबल्स ऑफ फ्रॅक्चर्ड टाइम्स’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्या वेळी ते बोलत होते. मनमोहन सिंग असंही म्हणाले की, पंतप्रधानांना माझा सल्ला आहे की, त्यांनी संयम बाळगून पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा राखावी. सध्या सार्वजनिक व्यासपीठावर बोलताना प्रचाराची पातळी घसरल्याचे पाहायला मिळत आहेत. याच दरम्यान, मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान मोदींना हा सल्ला देऊ केला आहे.
''पंतप्रधान म्हणून जेव्हा मी भाजपाशासित राज्यांचा दौरा करत होतो. त्यावेळेस भाजपाच्या मुख्यमंत्र्यांबरोबर माझे चांगले संबंध होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यास दुजोरा देतील. यूपीए सरकारच्या काळात भाजपाशासित राज्याबरोबर मी कधीच भेदभाव केला नाही'', असे मनमोहन सिंग यांनी सांगितले.