Manmohan Singh laid to rest: भारताचे माजी पंतप्रधानडॉ. मनमोहन सिंग आज (शनिवारी) पंचतत्त्वात विलीन झाले. त्यांच्या पार्थिवावर दिल्लीतील निगम बोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मनमोहन सिंग यांच्या मुलींनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी, काँग्रेसच्या सोनिया गांधी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. उपस्थितांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली.
आज संपूर्ण देशाने मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप दिला. मनमोहन सिंग यांचे पार्थिव आज सकाळी ८ वाजता त्यांच्या ३, मोतीलाल नेहरू रोड, नवी दिल्ली येथील निवासस्थानावरून काँग्रेस मुख्यालयात आणण्यात आले. यानंतर त्यांचे पार्थिव काही तास काँग्रेस कार्यालयात ठेवण्यात आले होते, तेथे सामान्य जनता आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. येथे सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर त्यांचे पार्थिव निगम बोध घाटावर नेण्यात आले. तेथे त्यांच्या मुलींनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
मनमोहन सिंग यांचे २६ डिसेंबरच्या रात्री निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिंग हे ९२ वर्षांचे होते. ते काही काळ आजारी होते. त्यांना एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मनमोहन सिंग २००४ ते २०१४ पर्यंत देशाचे पंतप्रधान होते. देशाच्या अर्थव्यवस्थेत त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांनी देशात आर्थिक सुधारणांचा पाया रचला. मनमोहन सिंग यांच्या स्मरणार्थ केंद्र सरकारने देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. पंतप्रधान असताना त्यांनी माहिती क्रांती, मनरेगा, शेतकऱ्यांची कर्जमाफी, शिक्षणाचा अधिकार अशी ऐतिहासिक पावले उचलली. त्यांनी माहितीचा अधिकार (आरटीआय), शिक्षणाचा अधिकार (आरटीई) आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) यासारख्या योजना आणल्या.