नवी दिल्ली: द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर या चित्रपटावरून वाद सुरू असताना आता यात शिवसेनेनं उडी घेतली आहे. मनमोहन सिंग हे अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर नव्हते, ते यशस्वी पंतप्रधान होते, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. नरसिन्हा राव यांच्यानंतर देशाला मिळालेले सर्वात्तम पंतप्रधान अशा शब्दांमध्ये राऊत यांनी मनमोहन सिंग यांचं कौतुक करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.जर एखादे पंतप्रधान 10 वर्षे देशाचा गाडा हाकत असतील आणि त्यानंतरही लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल आदराची भावना असेल, तर ते अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर आहेत असं मला वाट नाही, असं संजय राऊत म्हणाले. राऊत यांच्या या अप्रत्यक्ष टीकेला भाजपाकडून नेमकं काय उत्तर मिळणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. त्यावर काँग्रेस पक्षानं जोरदार टीका केली. हा चित्रपट माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची बदनामी करणारा असल्याचा आक्षेप काँग्रेसनं नोंदवला. द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर प्रदर्शित करण्याआधी काँग्रेससाठी त्याचं स्पेशल स्क्रिनिंग करण्यात यावं, अशी मागणी महाराष्ट्र युथ काँग्रेसनं केली. या चित्रपटातून कोणत्याही चुकीच्या आणि तथ्यहीन गोष्टी लोकांसमोर येऊ नयेत. त्यामुळे काँग्रेससाठी चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग करण्यात यावं, असं काँग्रेसनं म्हटलं होतं. या चित्रपटातून मनमोहन सिंग, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चुकीची प्रतिमा दाखवण्यात आल्याचा आक्षेप काँग्रेसनं घेतला आहे. द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर चित्रपट 11 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
मनमोहन सिंग अॅक्सिडेंटल नव्हे, तर यशस्वी प्राइम मिनिस्टर- शिवसेना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2019 4:31 PM