नवी दिल्ली - मोदी सरकारच्या नोटाबंदी निर्णयाला आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्तानं माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर निशाणा साधला आहे. अर्थव्यवस्थेला उद्ध्वस्त करणाऱ्या या निर्णयाचा परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागला आहे आणि यामुळे देशातील प्रत्येक व्यक्ती प्रभावित झाला आहे.
मनमोहन सिंग यांनी असंही म्हटलंय की, मोदी सरकारने आता असे कोणतेही पाऊल उचलू नये, ज्यामुळे अर्थव्यवस्थेसंदर्भात अनिश्चिततेची परिस्थिती निर्माण होईल. मोदी सरकारने 2016 मध्ये अनेक त्रुटींसहीत तसंच गांभीर्याने विचार न करता नोटाबंदीचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या अंमलबजावणीला आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. यामुळे उद्ध्वस्त झालेली भारतीय अर्थव्यवस्थेसहीत समाजातही याचे परिणाम स्पष्टपणे दिसत आहेत.
(Note Ban Anniversary: मनमोहन म्हणे, नोटाबंदी हा अपशकुनी निर्णय, जेटलींचा पलटवार)
मनमोहन सिंग यांनी नोटाबंदीच्या निर्णयाला संकुचित विचारांनी घेतलेला अपशकुनी निर्णय, असं संबोधलं आहे. नोटाबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्था रसातळाला गेल्याचं आता समोर आलं आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य व्यक्ती प्रभावित झाल्या. मग ते कोणत्या धर्म, जाती किंवा पेशा, संप्रदायाचे असो. असं म्हणतात, एखादी जखम झाल्यास ती भरून निघते, परंतु नोटाबंदीमुळे झालेली जखम दिवसेंदिवस अजून खोलवर जाताना दिसत आहे. नोटाबंदीमुळे जीडीपीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचं समोर आलं आहे.