कोची : भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसला सहकार्य करा, असे आवाहन माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी डाव्या पक्षांना केले आहे. मात्र, त्याचवेळी त्यांनी केरळातील माकपाच्या नेतृत्वाखालील एलडीएफ सरकारवर टीका केली आहे.काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीर सभेत मनमोहनसिंग म्हणाले की, राष्टÑीय पातळीवर आम्ही भाजपविरोधात संयुक्त आघाडीच्या स्वरूपात एकत्र उभे राहणार आहोत, की माकपा हा भाजप आणि काँग्रेसला समान अंतरावर ठेवणार आहे? भाजपचे बदशासन आणि विध्वंसक राजकारण याविरुद्ध लढण्यासाठी डाव्या पक्षांनी राष्टÑीय पातळीवर काँग्रेस नेतृत्वाशी सहकार्य करायला हवे.मनमोहनसिंग यांनी सांगितले की, पिनारायी विजयन यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात केरळात कायदा व व्यवस्था पूर्णत: कोसळली आहे. राज्यात महिलांना सुरक्षित वाटत नाही. आर्थिक प्रगती मंदावली आहे.राहुल गांधी यांच्या कामाची प्रशंसा- मनमोहनसिंग यांनी नंतर पत्रकारांशी बातचीत केली. हिमाचल प्रदेश आणि गुजरातेत काँग्रेसला जिंकण्याची किती संधी आहे, या प्रश्नावर त्यांनी पत्रकारांना सांगितले की, आमचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे या राज्यांत कठोर मेहनत घेत आहेत.मला असे वाटते की, या मेहनतीचे फळ म्हणून तेथे आम्हाला यश मिळेल; पण राजकारण हा बेभरवशाचा व्यवसाय असून काय होईल, हे कोणीच सांगू शकत नाही. आपण फक्त प्रयत्न करीत राहिले पाहिजे.- मनमोहनसिंग म्हणाले की, जीएसटीमुळे भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारविरुद्ध लोकांच्या मनात राग आहे; पण हा राग निवडणुकीत व्यक्त होईल का, हे सांगण्यास मी काही भविष्यवेत्ता नाही. मी आशावाद व्यक्त करू शकतो.
भाजपविरोधात मनमोहनसिंग यांची डाव्यांना साद; राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची संयुक्त आघाडी व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 2:25 AM