नवी दिल्ली: कोरोना संकट, सीमेवरील वाढता तणाव या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मन की बात'मधून देशवासीयांशी संवाद साधला. २०२० वर्ष आव्हानात्मक आहे. मात्र आपण सर्व आव्हानांचा हिमतीनं मुकाबला करू, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. सध्या देश अनलॉक होत आहे. मात्र सगळ्यांनीच काळजी घेणं गरजेचं असल्याचं मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा 'आत्मनिर्भर भारत'चा पुनरुच्चार केला.देशात मान्सूनचा हंगाम सुरू झाला आहे. या काळात आपण पर्यावरणाच्या संरक्षणासाठी पावलं उचलायला हवीत, असं मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी गणेश भक्तांना विशेष आवाहन केलं. 'सध्या अनेक ठिकाणी गणेशोत्सवाची तयारी सुरू आहे. यंदाचा गणेशोत्सव आपण पर्यावरणपूरक करू शकतो का? आपण केवळ पर्यावरणस्नेही मूर्तींची पूजा करू शकतो का?,' अशा शब्दांत मोदींनी इको-फ्रेंडली गणेशोत्सवाचा आग्रह धरला. विसर्जनानंतर नदी, तलावातील पाणी प्रदूषित करणाऱ्या, जलचरांसाठी धोका ठरणाऱ्या मूर्तींचा वापर आपण थांबवू शकतो का?, असा प्रश्न पंतप्रधानांनी उपस्थित केला. तुम्ही माझ्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद द्याल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता राज्यातील बऱ्याचशा मंडळांनी साधेपणानं गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक मोठ्या मंडळांनी कमी उंचीची मूर्ती आणण्याचा निर्धार केला आहे. पाद्यपूजन, आगमन मिरवणूक रद्द करणाऱ्या मंडळांची संख्यादेखील मोठी आहे.
Mann Ki Baat: यंदाचा गणेशोत्सव 'असा' साजरा व्हावा; मोदींचं गणेश भक्तांना खास आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 12:55 PM