नवी दिल्ली: भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांना लडाखमध्ये जशासं तसं प्रत्युत्तर देण्यात आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. भारत मैत्री निभावतो. मात्र कोणी आमच्याकडे वाकड्या नजरेनं पाहिल्यास त्याला प्रत्युत्तर देणंदेखील आम्ही जाणतो, अशा शब्दांत त्यांनी चीनसोबतच्या वाढत्या तणावावर भाष्य केलं. शत्रूला प्रत्युत्तर देताना आमचे जवान शहीद झाले. त्यांच्या शौर्याला संपूर्ण देश वंदन करत आहे. त्यांच्या योगदानाबद्दल देश कृतज्ञ आहे, नतमस्तक आहे, अशा शब्दांत मोदींनी वीरमरण पत्करलेल्या जवानांबद्दल त्यांच्या भावना व्यक्त केल्या. ते 'मन की बात'मधून देशवासीयांशी संवाद साधत होते.सध्याचा काळ संकटांचा आहे. मात्र संकटांवर मात करण्याची वृत्ती भारतीयांमध्ये आहे. २०२० वर्ष आव्हानात्मक आहे. आपण अम्फान, निसर्गसारख्या चक्रीवादळांचा सामना केला आहे. कोरोना संकटाला तोंड देत आहोत. याशिवाय लडाखमध्ये कुरघोड्या करणाऱ्या शेजाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं जात आहे, असं मोदी म्हणाले. संपूर्ण जग कोरोना संकटाचा सामना करत आहे. या काळात भारत जगाची मदत करत आहे. भारतानं कायम बंधुत्वाची भावना जोपासली आहे. कोरोना संकटकाळात ती अधोरेखित झाली आहे. मात्र आम्ही देशाचं सार्वभौमत्व टिकवण्यासाठी कटिबद्ध आहोत, अशा शब्दांत मोदींनी कोरोना संकट आणि सीमेवरील तणावावर भाष्य केलं.देशाला आत्मनिर्भर करण्याचा मानस पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा व्यक्त केला. लोकलसाठी व्होकल व्हा, या आवाहनाचा त्यांनी पुनरुच्चार केला. आत्मनिर्भर भारताचं स्वप्न देशवासीयांच्या मदतीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. यासाठी नागरिकांच्या समर्पणाची आणि सहकार्याची आवश्यकता आहे. तुम्ही लोकल वस्तू खरेदी करा आणि त्याच्या प्रसारासाठी शक्य तितके प्रयत्न करा. हीदेखील देशसेवाच आहे. आत्मनिर्भर भारत हीच देशासाठी बलिदान दिलेल्या जवानांसाठी खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना मोदींनी व्यक्त केली.