नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' कार्यक्रमातून देशवासीयांना संबोधित केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांनी देशवासीयांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'रक्षाबंधन सण हा भाऊ-बहिणीतील प्रेम आणि विश्वासाचे प्रतीक मानले जाते. शिवाय, फार पूर्वीपासून सामाजिक एकतेचे उत्तम उदाहरण देखील राहिले आहे'. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजलीदेखील वाहिली. 16 ऑगस्टला संपूर्ण देश शोकसागरात बुडाला होता. सर्व देशवासीयांच्या आठवणीत अटलजी कायम असतील, असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहिली. कार्यक्रमातील प्रमुख मुद्दे :
1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना जन्माष्टमीच्याही शुभेच्छा दिल्या. 2 सप्टेंबरला संपूर्ण वातावरण 'हाथी, घोड़ा, पालकी–जय कन्हैयालाल की, गोविंदा-गोविंदा' या जयघोषानं दणाणून निघेल, असं ते म्हणालेत.
2. बंगळुरू येथील इयत्ता दहावीत शिकणारी विद्यार्थिनी चिन्मयीनं आज संस्कृत दिवस असल्याची माहिती दिल्यााबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिचे आभार मानले.
3. केरळमध्ये आलेल्या जलप्रलयाबाबत बोलताना मोदी म्हणाले की, या कठिण प्रसंगी संपूर्ण देश केरळसोबत उभा आहे.
4. काल ओणम सणाचे पर्व सुरू झाले. आपण अशी प्रार्थना करुया की, हे ओणम पर्व देशाला विशेषतः केरळला शक्ती देवो. जलप्रलयाच्या संकटातून केरळ लवकर बाहेर येवो आणि केरळच्या विकासाच्या यात्रेला अधिक गती मिळो.
5. केरळमध्ये आलेल्या जलप्रयलामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या कठिण परिस्थितीत संपूर्ण देश केरळच्या बाजूनं उभा आहे. पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांप्रती शोकदेखील व्यक्त करण्यात आला.
6. शिक्षक दिनानिमित्त देशाचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या आठवणींना उजाळा दिला जातो. त्यांचा जन्मदिन देशभरात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनाच्याही देशवासीयांना शुभेच्छा दिल्या.
7. तिहेरी तलाक मुद्याबाबत मुस्लिम महिलांना न्याय मिळणार, असेही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
8. 29 ऑगस्टला आपण राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करणार आहोत, असं म्हणत पंतप्रधानांनी आशियाई स्पर्धांमध्ये पदके जिंकणाऱ्या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.