नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (28 जून) 'मन की बात' कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला आहे. देशावर आलेल्या संकटांसह अनेक मुद्दयांवर त्यांनी भाष्य केलं. कोरोना लॉकडाऊनमधून देश बाहेर आला आहे आणि अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र या दरम्यान अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे. मास्कचा वापर करणे आणि शारीरिक अंतर पाळणे अत्यंत गरजेचे आहे. स्वत:ची आणि दुसऱ्यांचीही काळजी घ्या असा सल्ला मोदींनी दिला. यावेळी पंतप्रधान मोदींनी मन की बातमध्ये एका व्यक्तीचा विशेष उल्लेख केला आहे. मोदींनी त्यांचं भरभरून कौतुक केलं आहे.
कर्नाटकच्या मांडवलीचे रहिवासी असलेल्या कामेगौडा यांचा मोदींनी आज आपल्या भाषणात खास उल्लेख केला आहे. मेंढपाळ असलेल्या 82 वर्षीय कामगौडा यांनी तब्बल 14 तलाव खोदले आहेत. कामगौडा यांच्या गावातील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येचा सामना करावा लागत होता. या समस्येवर मात करण्यासाठी त्यांनी तलाव खोदण्याचा निर्णय घेतला आणि आतापर्यंत 14 तलाव खोदल्याची माहिती मिळत आहे. कामेगौडा यांनी केलेले प्रयत्न खूपच मोठे आणि महत्त्वाचे आहेत असं म्हणत मोदींनी त्यांचं कौतुक केलं आहे.
आपल्या जनावरांना चरण्यासाठी बाहेर घेऊन गेल्यानंतर त्या वेळेत कामेगौडा यांनी आपल्या परिसरात नवीन तलाव खोदण्याचा निर्णय घेतला. गेल्या कित्येक वर्षांपासून ते गावकऱ्यांच्या हितासाठी तलाव खोदण्याचं काम करत आहेत. यामुळे त्यांच्या भागातील पाण्याची समस्या दूर झाली असून गावकऱ्यांनाही त्याचा मोठा फायदा झाला आहे. कामगौडा यांना त्यांच्या या उल्लेखनीय कामाबद्दल अनेक ठिकाणी गौरवण्यात आले आहे. तसेच बक्षीसही मिळाले आहे. मात्र त्या पैशांचा उपयोग ते स्वत: साठी न करता गावच्या हितासाठी, तलाव बांधण्यासाठी करत आहेत. पंतप्रधानांनी त्यांच्या या कार्याची दखल घेऊन आपल्या भाषणात कामेगौडा यांचा खास उल्लेख केला.
नरेंद्र मोदी 'मन की बात'मधून देशवासीयांशी संवाद साधत होते. भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांना लडाखमध्ये जशासं तसं प्रत्युत्तर देण्यात आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. भारत मैत्री निभावतो. मात्र कोणी आमच्याकडे वाकड्या नजरेनं पाहिल्यास त्याला प्रत्युत्तर देणंदेखील आम्ही जाणतो, अशा शब्दांत त्यांनी चीनसोबतच्या वाढत्या तणावावर भाष्य केलं. शत्रूला प्रत्युत्तर देताना आमचे जवान शहीद झाले. त्यांच्या शौर्याला संपूर्ण देश वंदन करत आहे. त्यांच्या योगदानाबद्दल देश कृतज्ञ आहे, नतमस्तक आहे, अशा शब्दांत मोदींनी वीरमरण पत्करलेल्या जवानांबद्दल त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! देशातील रुग्णसंख्येत विक्रमी वाढ, चिंता वाढवणारी आकडेवारी
CoronaVirus News : आनंदाची बातमी! देशाचा रिकव्हरी रेट 58%, जवळपास 3 लाख लोकांनी केली कोरोनावर मात
Google Pay चा वापर करणं धोकादायक, खरंच RBI ने घातली बंदी?; जाणून घ्या नेमकं काय आहे 'हे' प्रकरण
CoronaVirus News : राज ठाकरेंच्या 'कृष्णकुंज'मध्ये कोरोनाचा शिरकाव; घरकाम करणाऱ्या दोघांना लागण