नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रविवार (28 फेब्रुवारी) मन की बात कार्यक्रमातून (Mann Ki Baat) देशवासियांशी संवाद साधला आहे. कला, संस्कृती, पर्यटन आणि शेतीविषयक गोष्टींबाबतची काही प्रेरणादायी उदाहरण देत त्यांनी संवाद साधला. याच दरम्यान मोदींनी एक खंत व्यक्त केली आहे. पंतप्रधानांनी आपल्या मन की बात या कार्यक्रमात बोलताना याबद्दलची माहिती दिली आहे. जगातील सर्वात जुनी भाषा तमिळ न शिकण्याचं दुःख आहे असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
मन की बातमध्ये बोलताना मोदी यांनी काही दिवसांपूर्वी हैदराबादच्या अपर्णा रेड्डी यांनी प्रश्न विचारला होता. रेड्डी यांनी मोदींना इतक्या वर्षांपासून तुम्ही पंतप्रधान आहात, त्याआधी अनेक वर्ष मुख्यमंत्री होता. तुम्हाला असं कधी वाटतं का, की स्वतःमध्ये काही कमी राहिली आहे. यावर पंतप्रधान यांनी अपर्णा यांच्या प्रश्नाचं उत्तर सोपं आणि अवघड दोन्ही होतं. ते म्हणाले, की "कधी कधी खूप सोपे प्रश्नही आपल्याला विचार करण्यास भाग पाडतात. हे प्रश्न सोपे असतात मात्र मनापर्यंत पोहोचतात."
पंतप्रधानांनी अपर्णा यांच्या प्रश्नाने त्यांना काही वेळ विचार करण्यास भाग पाडलं असल्याचं म्हटलं आहे. तसेच मोदी यांनी "मी या प्रश्नाचा विचार केला आणि स्वतःलाच म्हटलं, की माझ्यातील एक कमी ही आहे की मी जगातील सर्वात प्राचीन भाषा तमिळ शिकण्यासाठी जास्त प्रयत्न करू शकलो नाही. ही एक अशी सुंदर भाषा आहे, जी जगभरात लोकप्रिय आहे. अनेकांनी मला तमिळ साहित्याचं वेगळपण आणि यातील कवितांची सखोलता यांच्याबद्दल सांगितलं आहे" असं म्हटलं आहे.
नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पुद्दुचेरीमध्ये जनतेला संबोधित केलं आहे. या सभेदरम्यान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विविध मुद्द्यांवरून निशाणा साधला आहे. काँग्रेस खोट्याच्या आधारावर चालते असा घणाघात मोदींनी केला आहे. "पुद्दुचेरीमधील हवा आता बदलत आहे. हे या सभेतून दिसून आलं आहे. गेल्या निवडणुकीत येथील लोकांनी काँग्रेसला मत दिलं. मात्र काँग्रेसने लोकांना धोका दिला आहे" असं मोदींनी म्हटलं आहे. तसेच राहुल गांधी यांनी मच्छीमारांसाठी स्वतंत्र मंत्रालय करू या केलेल्या विधानावरही पलटवार केला आहे. मोदी यांनी "काँग्रेसने लोकांची स्वप्न भंग केली आहेत. येथे जे सरकार होतं ते लोकांचं नाही तर काँग्रेसच्या हायकमांडची सेवा करत होतं. येथील माजी मुख्यमंत्री काँग्रेस हायकमांडची चप्पल घेऊन जात असत, मात्र येथील लोकांना गरिबीतून वर काढू शकत नव्हते. काँग्रेसच्या सरकारने लोकांसाठी काम केलं नाही तसेच काँग्रेसने इतरांनाही लोकांसाठी काम करण्याची परवानगी दिली नाही. राज्य सरकारने आपल्या कार्यकाळात येथे केंद्र योजना राबवण्यास परवानगी दिली नाही" असं म्हटलं आहे.