नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे देशवासीयांसोबत संवाद साधला. पंतप्रधान मोदींनी देशाच्या सैनिकांबाबत आजच्या कार्यक्रमात आपल्या भावना व्यक्त केल्या. दोन वर्षांपूर्वी भारतीय लष्करानं पाकिस्तानविरोधात केलेल्या सर्जिकल स्ट्राइक कारवाईच्या आठवणी त्यांनी जागवल्या आणि सैनिकांनी बजावलेल्या कामगिरीला सलामही केला. सर्जिकल स्ट्राइकला दोन वर्ष पूर्ण झाली, याबाबत सर्व देशवासीयांनी 29 सप्टेंबर हा दिवस 'पराक्रम दिवस' म्हणून साजरा केला.
जे आमच्या देशातील शांतता आणि प्रगती नष्ट करण्याचा प्रयत्न करतील, त्या सर्वांना आमचे जवान सडेतोड उत्तर देतील. आमच्या देशातील शांतता भंग करण्याचा जो कोणी प्रयत्न करेल त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. देशाच्या सन्मानासोबत कोणताही तडजोड केली जाणार नाही, असा इशारा यावेळी पंतप्रधान मोदींनी दिला.
यावेळेस त्यांनी नौदल अधिकारी अभिलाष टॉमीसंदर्भातही चर्चा केली, 'अभिलाष यांचा जीव कसा वाचवला जाणार, याबाबत संपूर्ण देश चिंतेत होता. ते खोल समुद्रात अडकले होते. न खाता-पिता मृत्युशी झुंज देत होते. अभिलाष हे धाडसी सैनिक आहेत. त्यांच्यासोबत फोनवरुन संवाद साधला तेव्हा त्यांनी पुन्हा असा पराक्रम करण्याचा संकल्प व्यक्त केला, अशी माहितीही पंतप्रधान मोदींनी दिली.
महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त देशभरात कार्यक्रम राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त आजपासून पुढील 2 वर्षांसाठी जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. महात्मा गांधींच्या विचारांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले आहे. गांधीजींच्या विचारांनी प्रत्येकाला शक्ती मिळली आहे.