नवी दिल्ली: येत्या 4 दिवसांत हे वर्ष संपणार आहे. तत्पुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या वर्षाच्या अखेरच्या मन की बात (Mann ki Baat) मधून देशातील जनतेला संबोधित केले. ‘मन की बात’ चा आज 84 वा कार्यक्रम होता. या मन की बातमधून पंतप्रधानांनी कोरोना, लसीकरण, ओमायक्रॉन आणि तामिळनाडूतील हेलिकॉप्टर अपघातावरही भाष्य केले.
140 कोटी लसीकरण झालेआज सकाळी 11 वाजता ‘मन की बात’ मधून देशाला संबोधित करताना मोदी म्हणाले की, सध्या देशात कोरोनाच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटवर अभ्यास सुरू आहे. याला रोखण्यासाठी आपल्या सर्वांना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. कोरोनाच्या कठीण प्रसंगी आपण सर्व कुटुंबाप्रमाणे एकमेकांच्या पाठीशी उभे राहिलो. प्रत्येकाने आपापल्या परिसरात एखाद्याला मदत करण्यासाठी खूप प्रयत्न केले. सध्या देशात लसीकरणाचा 140 कोटी डोसचा टप्पा पार झाला आहे. ही भारतासाठी गौरवाची बाब आहे.
लोकांनी मिळून सर्वात मोठ्या महामारीला हरवलेमोदींनी पुढे म्हटले की, ही जनशक्तीची ताकद आहे की, सर्वांच्या प्रयत्नांनी आपण मागील 100 वर्षात आलेल्या सर्वात मोठ्या महामारीचा सामना समर्थपणे केला. कोरोनाचा नवीन व्हेरिएंटचा आपले वैज्ञानिक अभ्यास करत आहेत. दररोज मिळत असलेल्या डेटाच्या आधारावर काम केले जात आहे. मात्र आपल्याला सजग आणि अनुशासित राहायचे आहे. नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटवर वैज्ञानिक अभ्यास करत आहे. दररोज नवीन डाटा त्यांना मिळत आहे. त्यांच्या सूचनांवर काम केले जात आहे.
विद्यार्थ्यांसोबत 'परीक्षा पे चर्चा' करणार
पीएम मोदी पुढे म्हणाले की, यावर्षीही मी परीक्षेच्या आधी विद्यार्थ्यांशी चर्चेची योजना आखत आहे. या कार्यक्रमाची नोंदणी MyGov.in वर 28 डिसेंबरपासून सुरू होणार असून, 20 जानेवारीपर्यंत चालणार आहे. यासाठी इयत्ता 9 वी ते 12 वी साठी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी ऑनलाईन स्पर्धाही आयोजित करण्यात येणार आहे. तुम्ही सर्वांनी यात सहभागी व्हावे, असे ते म्हणाले.
कॅप्टन वरुण सिंग यांचे पत्र प्रेरणादायी
पंतप्रधान पुढे म्हणाले, महाभारताच्या युद्धाच्या वेळी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला 'नभः स्पृशम् दीपतम' म्हणजेच अभिमानाने आकाशाला स्पर्श करण्याचेस सांगितले होते. हे भारतीय हवाई दलाचे ब्रीदवाक्यही आहे. ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचे जीवन असेच होते. या महिन्यात तामिळनाडूमध्ये अपघातग्रस्त हेलिकॉप्टर वरुण सिंह उडवत होता. त्या अपघातात आपण देशाचे पहिले CDS जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह अनेक वीरांना गमावले. वरुण सिंगनेही मरेपर्यंत अनेक दिवस शौर्याने लढा दिला पण नंतर तेही आपल्याला सोडून गेले.
या वर्षी ऑगस्टमध्ये त्यांना शौर्य चक्र प्रदान करण्यात आले होते. जेव्हा वरुण रुग्णालयात होते, त्यावेळी त्यांनी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांना लिहीलेले पत्र सोशल मीडिआवर व्हायरल झाले होते. हे पत्र वाचून माझ्या मनात पहिला विचार आला, तो म्हणजे यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही वरुण सिंह जमिनीशी जुडलेले होते. दुसरा विचार आला की, उत्सव साजरा करण्याची वेळ आली तेव्हा ते येणाऱ्या पिढ्यांची काळजी घेत होते. आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे जीवनही एक उत्सव व्हावे, अशी त्यांची इच्छा होती.
शनिवारी मोठ्या घोषणा
याआधी शनिवारी रात्री पीएम मोदींनी 13 मिनिटे 46 सेकंदांच्या भाषणात अनेक मोठ्या घोषणा केल्या होत्या. ते म्हणाले होते की 3 जानेवारीपासून देशात 15 ते 18 वर्षे वयोगटातील सुमारे 8 कोटी मुलांना कोरोनाची लस दिली जाईल. याशिवाय, 10 जानेवारीपासून, आरोग्य कर्मचार्यांसह सुमारे 30 दशलक्ष फ्रंट लाईन कामगारांना 'प्रिकोशन डोस' (कोरोनाची लागण होण्याची शक्यता असलेल्यांना दिलेला बूस्टर डोस) दिला जाईल. याशिवाय, 60+ वयोगटातील गंभीर आजारी नागरिकांना त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लसीचा तिसरा डोस दिला जाईल. याची सुरुवातही 10 जानेवारीपासून होणार आहे.
डीएनए लस लवकरच उपलब्ध होईलPM मोदी म्हणाले की, लवकरच देशात अनुनासिक लस आणि जगातील पहिली DNA लस सुरू केली जाईल. मात्र, पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा देशवासियांना कोरोना महामारी रोखण्यासाठी सर्व उपायांचे पालन करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, साथीच्या आजारावर मात करण्यासाठी मास्क घालण्यासारख्या उपायांचा अवलंब करणे आवश्यक आहे.
2014 पासून सतत करत आहेत 'मन की बात'
पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी रेडिओवर ‘मन की बात’ कार्यक्रमाची सुरुवात केली होती. ऑक्टोबर 2014 मध्ये मोदींनी मन की बातची सुरुवात केली होती. पंतप्रधान मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवार मन की बातद्वारे संवाद साधत असतात. आज 84 वी मन की बात आहे. या कार्यक्रमाचे पहिले प्रसारण 3 ऑक्टोबर 2014 साली झाले होते. त्यानंतर प्रत्येक महिन्याला पंतप्रधान या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांसोबत अनेक मुद्द्यावर चर्चा करतात.