हरीश गुप्ता,
नवी दिल्ली- आम आदमी पार्टीचे (आप) खासदार भगवंत मान यांच्यावर कारवाई करण्यासाठी सगळ््या पक्षांचे संसद सदस्य शुक्रवारी एक झाले होते. त्यांनी विनाअट क्षमाही मागितली परंतु त्यांच्या व्हिडिओ प्रकरणाने राज्यसभेत वारंवारच्या गोंधळामुळे नकोसे वळण घेतले व पर्यायाने अडीच वाजता कामकाज तहकूब करावे लागले. राज्यसभेत अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल (अकाली दल) आणि इतर मंत्र्यांनी तसेच सत्ताधारी सदस्यांनी गोंधळ घातला. या गोंधळामुळे काँग्रेसच्या सदस्यांना धक्का बसला. काँग्रेसच्या सदस्यांनी सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांना कामकाज विस्कळीत करू नका, अशी विनंती केली. कारण लोकसभेत सभापतींनी मान यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मान हे लोकसभेचे सदस्य असून त्यांच्या वर्तनाचा निषेध झाला असून छाननीही होत आहे.आंध्र प्रदेशला आश्वासन दिल्याप्रमाणे विशेष वर्ग दर्जा मिळण्याच्या खासगी विधेयकावर चर्चा होऊ द्यावी अशी काँग्रेसची मागणी होती. परंतु कौर आणि भाजपच्या इतर सदस्यांनी कामकाज तहकूब करायला भाग पाडले. तरीही प्रकरण तेथे थांबले नाही. सभागृह दिवसभरासाठी तहकूब झाल्यानंतर जयराम रमेश कौर यांच्याकडे चालत गेले व ‘तुम्ही मंत्री असल्यामुळे तुम्हाला सभागृहाचे कामकाज विस्कळीत करणे शोभत नाही’, असे म्हणाले. दुसरे म्हणजे हरसिमरत कौर या सभागृहाच्या सदस्यही नाहीत परंतु कौर यांनी त्यांचे न ऐकता खाली बसून घोषणा द्यायला सुरवात केली. अशा तत्वांबरोबर काँग्रेसची हातमिळवणी असल्याचा आरोपही कौर यांनी केला.माजी केंद्रीय मंत्री रेणुका चौधरी यांनी आरडाओरड करून आंध्र प्रदेशचा विकास भाजपला नको आहे असा आरोप केला व भाजपने आज विधेयक बुडविले. परंतु असे घडू दिले जाणार नाही, असे त्या म्हणाल्या. प्रकरण वाईट वळणावर जाण्याची चिन्हे होती परंतु मध्यस्थांनी हस्तक्षेप केला व सगळे जण सभागृहाबाहेर गेले. लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन म्हणाल्या की मान यांच्याविरोधात काय कारवाई करायची हे सूचविण्यासाठी सदस्यांची समिती स्थापन केली जाईल. मान हे संसदेत दारुच्या नशेत आल्याच्या तक्रारींचीही मी दखल घेतली असल्याचे त्या म्हणाल्या. मान यांनी हा आरोप संसदेबाहेर वार्ताहरांशी बोलताना फेटाळला. बेशिस्तीबद्दल ‘आप’ने वर्षभरापूर्वी निलंबित केलेले खासदार हरिंदर सिंग खालसा यांना संसदेत मान यांच्या शेजारी जागा देण्यात आली आहे. खालसा यांनी मान यांच्याविरोधात लेखी तक्रार दिली आहे. तीत त्यांनी मान यांच्या तोंडाला दारुचा भपकारा आल्याचे म्हटले. इतर खासदारांनीही मान यांच्या तोंडाला दारुचा वास येत असल्याच्या तक्रारी केल्या असल्याचे सुमित्रा महाजन म्हणाल्या. २००१ मध्ये दहशतवाद्यांच्या कार संसदेच्या मुख्य इमारतीपर्यंत आल्या त्या भागाचे चित्रीकरण भगवंत मान यांनी केले होते. त्या हल्ल्यात नऊ लोक आणि ‘लष्कर ए तयबा’चे पाच दहशतवादी ठार झाले होते. तेव्हापासून संसदेच्या कोणत्या भागाचे प्रसारमाध्यमांनी आणि इतरांनी चित्रीकरण करायचे याचे कठोर नियम तयार करण्यात आले आहेत. .>शिक्षा काय द्यायची, हेही समिती ठरवेलमान यांचे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे सोपविण्यात येत असून त्यांना काय शिक्षा द्यायची हे ही समिती ठरवेल. सध्या हे प्रकरण महाजन यांच्याकडे असून त्या आपला निर्णय सोमवारी सांगतील. लोकसभेचे कामकाज नुकतेच सुरू झाले होते तेवढ्यात गोंधळाला सुरवात झाली त्यामुळे महाजन यांना गोंधळ कशामुळे होतोय हे समजले नाही. अनेक सदस्यांनी विशेषाधिकार हननाची नोटीस आधीच दिली होती. सत्ताधारी पक्षाचे सदस्यही सभागृहाचे कामकाज होऊ देत नव्हते. किरीट सोमय्या म्हणाले की मान यांनी ज्या पद्धतीने व्हिडिओ तयार करून फेसबुकवर अपलोड केला त्यामुळे संसदेच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. मान यांचे सदस्यत्व रद्द करण्याची त्यांची मागणी होती. इतर सदस्यांनीही हीच मागणी केली व गोंधळ सुरूच राहिला. कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब करावे लागले. ते नंतर सुरू होताच सदस्यांनी मानविरुद्ध विशेषाधिकार हनन झाल्याचा मुद्दा उपस्थित केला व तत्काळ कारवाईची मागणी केली. महाजन यांनी प्रकरण गंभीर असून त्याची मी नोंद घेतली असल्याचे सांगितल्यावरही गोंधळ थांबत नव्हता.