नवी दिल्ली - Manohar Joshi Death ( Marathi News ) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या निधनानं राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. मनोहर जोशी यांना गुरुवारी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये नेले. परंतु त्याठिकाणी पहाटे ३ च्या सुमारास मनोहर जोशी यांची प्राणज्योत मालवली. जोशींच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनीही त्यांना आदरांजली वाहिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटलंय की, मनोहर जोशी यांच्या निधनाने दुःख झाले. ते एक दिग्गज नेते होते ज्यांनी लोकसेवेत अनेक वर्षे घालवली आणि महापालिका, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या प्रगतीसाठी अथक परिश्रम घेतले. केंद्रीय मंत्री म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. लोकसभा अध्यक्ष म्हणून आपल्या कार्यकाळात त्यांनी संसदीय प्रक्रियेला अधिक गतिमान आणि सहभागी बनवण्याचा प्रयत्न केला. मनोहर जोशींचे कार्य कायम स्मरणात राहील अशी शोकभावना त्यांनी व्यक्त केली आहे.
तर माजी लोकसभा अध्यक्ष, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाची बातमी दु:खदायक आहे. देश आणि महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचे योगदान कायम आठवणीत राहील. जोशींच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो अशी प्रार्थना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते मनोहर जोशी सरांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले. सरांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरवला. अतिशय नम्र, हजरजबाबी आणि महाराष्ट्र तसेच मराठी माणूस यांच्याविषयी मनापासून तळमळ असलेला नेता आपण गमावला आहे. युती सरकारच्या काळात जोशी सरांच्या नेतृत्वाखाली मला काम करण्याची संधी मिळाली. कुटुंब प्रमुखाप्रमाणेच कायम त्यांचे मार्गदर्शन लाभले. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याची शक्ती देवो अशी भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मांडली.