ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 18 - बोलण्याचे स्वातंत्र्य सर्वाना आहे; परंतु कोणालाही कायदा हातात घेऊ देणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी आझाद मैदानात क्रांतिदिन कार्यक्रमात रविवारी दिला. रामनाथी-फोंडा येथे झालेल्या हिंदू जहालवाद्यांच्या संमेलनात बीफ मुद्द्यावरून झालेल्या प्रक्षोभक भाषणांच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री बोलत होते. परंतु त्याचा कोठेही थेट उल्लेख त्यांनी केला नाही. मुख्यमंत्री म्हणाले, काहीजण गोव्यात येतात आणि काही विषय उपस्थित करतात, ज्याचा गोव्याशी काहीही संबंध नसतो. या विषयांवर राज्याची स्पष्ट भूमिका आहे. आम्ही कायदा पाळणारे आहोत. रामनाथी येथे नुकत्याच झालेल्या हिंदू संमेलनात छिंदवाडा (मध्यप्रदेश) सनातन धर्म प्रचार सेवा समितीच्या अध्यक्षा साध्वी सरस्वती यांनी बीफ खाणा-यांना भर चौकात फासावर लटकवा, असे प्रक्षोभक विधान केले होते. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बोलत असल्याचे स्पष्ट होत होते. गोव्यात येऊन कोणीही काहीही बोलले तर त्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिलीच पाहिजे असे नाही; कारण बोलण्याचा अधिकार सर्वानाच आहे. कायदा सुव्यवस्था राखणे सरकारचे प्राथमिक कर्तव्य आहे याची सरकारला जाणीव आहे. काहीजण मुद्दाम गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, तर काहीवेळा नकळत तो निर्माण होतो. आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करतो; परंतु कोणी कायदा हातात घेत असेल तर गप्प बसणार नाही, असेही ते म्हणाले.
कोणालाही कायदा हातात घेऊ देणार नाही- मनोहर पर्रिकर
By admin | Published: June 18, 2017 8:51 PM