पणजी, दि. 23 - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर विक्रमी मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केला आहे. सांपेद्र येथील रायबंदर सरकारी प्राथमिक शाळेतील केंद्रावर दुपारी मतदान केल्यानंतर नाईक म्हणाले की, ''गेल्या निवडणुकांपेक्षा यावेळी मनोहर पर्रीकर यांना जास्त मताधिक्य मिळेल. पर्रीकर यांनी ज्या पद्धतीनं गोव्याचा विकास केला आहे ते पाहता लोकं त्यांच्याबरोबरच राहतील. वाळपईत विश्वजित राणे हे यशस्वी आणि कर्तबगार मंत्री म्हणून ओळखले जातात त्यांनाही लोकांचा पाठिंबा आहे. दोन्ही मतदारसंघामध्ये भाजपाला बाहेरुन उमेदवार आणावे लागले''.
दुसरीकडे गोवा सुरक्षा मंचचे मार्गदर्शक तथा माजी संघप्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी मात्र या निवडणुकीत त्यांचा उमेदवार आनंद शिरोडकर हे पर्रीकर यांचा पराभव करुन निवडून येतील, असा दावा केला आहे. ते म्हणाले की, गेल्यावेळेला लोकांची अशी भावना बनली होती की गोवा सुरक्षा मंचला मते दिल्यास बाबुश मोन्सेरात हे निवडून येतील. त्यामुळे त्यांनी भाजपाला मतदान केले आणि सिद्धार्थ निवडून आले परंतु यावेळी परिस्थिती वेगळी आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत चार तासांच्या कालावधीत पणजीत ३४.६५ टक्के तर वाळपईत ४0.0२ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिली.