ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि, १३ - गोवा, उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्या असून निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीकडे प्रतिष्ठेची म्हणून बघितले जात असतानाच गोवा व पंजाबसह इतर राज्येही महत्वपूर्ण आहेत. केंद्रातील भाजपा सरकार 'शतप्रतिशत भाजपा'चा नारा दिला असून त्यांच्यासाठी गोव्यातील निवडणूकही अतिशय महत्वाची ठरणार आहे.
त्याच पार्श्वभूमीवर गुरूवारी पक्षाने २९ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. विशेष म्हणजे भाजपाने या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आधीच जाहीर न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र निवडमुकीनंतर संरक्षणमंत्री व माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनाच गोव्यात परत पाठवले जाऊ शकते, असे संकेत मिळत आहेत. केंद्रीय मंत्री आणि गोवा निवडणूकीचे भाजपाचे प्रचारप्रमुख नितीन गडकरी यांनीच तसे संकेत दिले आहेत. ' पक्षाच्या आमदारांची संमती दिल्यास दिल्लीतील एका नेत्याला गोव्याचे मुख्यमंत्रीपद सोपवण्यात येऊ शकते' असे विधान गडकरी यांनी एका पत्रकार परिषदेत केले.
भाजपाच्या सूत्रांनुसार, पर्रीकर पुन्हा (गोवा) राज्याच्या राजकारणात परतू शकतात आणि केंद्रीय नेतृत्वानेही या विचाराला मान्यता दिली आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चाही केल्याचे समजते.
या सर्व पार्श्वभूमीवर गडकरींनी केलेले विधान महत्वपूर्ण मानले जात आहे.
' नवीन निवडून आलेले आमदार नव्या नेत्याची निवड करतील, मात्र तो (नेता) त्यांच्यापैकीच एक असेल हे गरजेचं नाही. केंद्रातील एखादा नेताही राज्याच्या नेतृत्वासाठी पाठवण्यात येऊ शकतो' असे गडकरींनी नमूद केले. तुमच्या बोलण्याचा रोख पर्रीकर यांच्या दिशेने आहे का असा प्रश्न विचारला असता, गडकरींनी त्यावर स्पष्ट उत्तर देणे टाळले. ' पक्षात नेत्यांची कमी नाही. मी जे बोललो नव्हतो, तोच अर्थ तुम्ही कसा काढलात? ज्यांना समजायचे असेल, ते या वाक्याचा अर्थ नक्कीच समजतील' असेही त्यांनी नमूद केले. पर्रीकरांनी गोव्यात परतण्याविषयी कोणतीही उत्सुकता दर्शवली नाही, तरी पक्षाने सर्व पर्याय खुले ठेवले आहेत.