Haryana Politics: हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल (Manoharlal Khattar) यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. खट्टर यांनी बुधवारी हरियाणा विधानसभेत बहुमत चाचणी झाल्यानंतर आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. खट्टर कर्नाल विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. दरम्यान, त्यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या कर्नाल जागेवरुन नवनिर्वाचित मुख्यमंत्री नायबसिंग सैनी पोटनिवडणूक लढवणार आहेत. सध्या ते हरियाणातील गुरुक्षेत्र मतदारसंघाचे खासदार आहेत.
सभागृहात आपल्या भाषणादरम्यान माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर म्हणाले की, आता नायबसिंग सैनी कर्नालच्या जनतेची सेवा करतील. यापुढे पक्षश्रेष्ठी माझ्यावर जी जबाबदारी सोपवतील, ती प्रामाणिकपणे आणि अधिक सुरळीतपणे पार पाडेन. कर्नालमधून लोकसभानिवडणूक लढवायची की नाही, याचा निर्णयदेखील भाजपचे संसदीय मंडळ घेईल, अशी माहिती खट्टर यांनी दिली.
दोनवेळा हरियाणाचे मुख्यमंत्रीमनोहर लाल खट्टर यांनी दोनवेळा हरियाणाचे मुख्यमंत्रिपद भूषवले आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर पक्षाने त्यांना मुख्यमंत्री केले. 2019 मध्येही त्यांनी कर्नालमधून निवडणूक जिंकली. पक्षाने पुन्हा त्यांना हरियाणाचे मुख्यमंत्री केले. खट्टर मूळ हरियाणातील रोहतक येथील आहेत. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब पाकिस्तानातून येथे स्थायिक झाले होते.
हरियाणात काय घडले?12 मार्च रोजी मनोहर लाल खट्टर यांनी अचानक मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काही तासांतच पक्षाने खासदार नायब सिंग सैनी यांना मुख्यमंत्री केले. मुख्यमंत्री बनल्यानंतर सैनी यांनी राज्यपालांना भेटून विश्वासदर्शक ठराव मांडण्याचा प्रस्ताव ठेवला, त्यानुसार आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला आणि हा आवाजी मतदानाने मंजूर झाला. यासह हरियाणाच्या नवीन सैनी सरकारने फ्लोर टेस्ट पास केली.