ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 17 - उत्तरप्रदेशात भाजपाने ऐतिहासिक विजय मिळवला असला तरी अद्यापही पक्षाने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केलेला नाही. मुख्यमंत्रीपदासाठी अनेक दावेदार असले तरी सध्या केंद्रीय दूरसंचार मंत्री आणि रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा या शर्यतीत आघाडीवर असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा हे कार्ड वापरण्याची शक्यता आहे. मनोज सिन्हा यांची स्वच्छ प्रतिमा आणि नेतृत्वगुण पाहत मुख्यमंत्रीपदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडण्याची शक्यता असल्याचं सुत्रांकडून कळत आहे.
भाजपासमोर मुख्यमंत्रीपदासाठी असलेल्या पर्यायांमध्ये राजनाथ सिंह, भाजपा प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्या, दिनेश शर्मा आणि योगी आदित्यनाथ यांची नावे आहेत.
उत्तरप्रदेशातील राजकारणाची माहिती असणारे मनोज सिन्हा यांना चांगलेच ओळखतात. विद्यार्थी असल्यापासून राजकारणात सक्रिय झालेले मनोज सिन्हा बनारस हिंदू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. सिन्हा यांनी सिव्हील इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहे. भाजपाच्या तिकीटावर गाजीपूरमधून निवडून आल्यानंतर त्यांचा ख-या अर्थाने राजकारणात प्रवेश झाला. 1996 मध्ये त्यांनी पहिली निवडणूक लढवली होती. आतापर्यंत तीन वेळा ते खासदार म्हणून निवडून आले आहेत. यानंतर त्यांची केंद्रीय दूरसंचार मंत्री आणि रेल्वे राज्यमंत्री पदी बढती करण्यात आली होती.
सूत्रांच्या माहितीनुसार, लखनौमध्ये 18 मार्चला होणाऱ्या आमदारांच्या बैठकीत उत्तर प्रदेशचे भाजप प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्य हे मुख्यमंत्रिपदासाठी मनोज सिन्हा यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवतील. निरीक्षक म्हणून नेमणूक झालेले व्यंकय्या नायुडू आणि भूपेंद्र यादव हे मनोज सिन्हा यांच्या नावावर आमदारांची संमती घेतील आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना त्याबाबत माहिती देतील. त्यानंतर अमित शाह स्वत: मनोज सिन्हा यांच्या नावाची घोषणा करतील.
मनोज सिन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी सर्वात जमेची बाजू म्हणजे आतापर्यंत ते कोणत्याही वादात अडकलेले नाहीत. आपल्या नेतृत्व कौशल्याने आणि कामाने त्यांनी अमित शहा यांनाही प्रभावित केलं आहे. मनोज सिन्हा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांचे निकटवर्तीय मानले जातात. केंद्रीय मंत्र्यांनीही मनोज सिन्हा यांच्या नावावर संमती दर्शवली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, उमा भारती, डॉ. महेश शर्मा, महेंद्र पांडे यांनीही सिन्हांच्या नावाला समर्थन दिलं आहे.
दुसरीकडे उत्तर प्रदेश निवडणुकीत विजयाच्या शिल्पकारांपैकी एक असलेले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्य यांना प्रकृती अस्वस्थामुळे दिल्लीच्या आरएमएल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मौर्य यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. रक्तदाबाचा त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. केशव प्रसाद मौर्य हे उत्तरप्रदेशात भाजपाकडून मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेत.