नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर चढवलेल्या हवाई हल्ल्यानंतर भारत देशभक्तीच्या लाटेवर स्वार झाला आहे. या लाटेचा फायदा भाजपाचे नेते घेत असल्याचे आरोप विरोधकांकडून होत असताना भाजपाच्या नेत्यांचीही वर्तणूक तशीच दिसत आहे. कर्नाटकातील भाजपाचे नेते येडीयुराप्पा यांनी कर्नाटकात आता 22 जागा जिंकता येतील असे वक्तव्य केलेले असतानाच दिल्लीतील भाजपाचे नेते मनोज तिवारी यांनी चक्क लष्कराचा गणवेश घालून भाजपाची बाईक रॅली काढल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
भाजपाचे दिल्ली अध्यक्ष आणि खासदार मनोज तिवारी यांनी यमुना विहारमध्ये 2 मार्चला रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी लष्कराचा गणवेश परिधान केला होता. भाजपाच्या नेत्यांनी पुलवामा हल्ला झाल्यानंतर देशात आलेल्या देशभक्तीच्या लाटेचा फायदा उठविण्याची वक्तव्ये केली होती. तसेच विरोधी पक्षांकडूनही मोदी सरकार आणि त्यांचे नेते पुलवामा हल्ला आणि हवाईदलाच्या हल्ल्याचा निवडणूकीसाठी वापर करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
पुलवामामध्ये आत्मघाती हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांवरून गुजरातमधील भाजपाचे नेते आणि प्रवक्ते भरत पंड्या यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाल्यामुळे देशात 'देशभक्तीचे वारे वाहू लागले आहेत, त्याचा मतांसाठी फायदा उठवा', असा आदेशच त्यांनी कार्यकर्त्यांना एका सभेवेळी दिला होता. पंड्या पुढे म्हणाले होते, की काश्मीरमध्ये जो हल्ला झाला...तुम्ही सर्वांनी त्याचे व्हिडिओ, फोटो पाहिले असतील. देशातील लोक सर्व मतभेद दूर करून राष्ट्रभक्तीमुळे एकत्र आलेत. या लोकांनी रॅली आणि आंदोलने करून देशाप्रती असलेले प्रेम दाखविले आहे. पुलवामामध्ये याआधीही अनेक हल्ले झाले आहेत. देशातील लोक रात्रंदिवस हेच पाहत आहेत की, भारताकडून पाकिस्तानवर काय कारवाई केली जातेय. देशात आज ही भावना आहे. पूर्ण देश राष्ट्रभक्तीच्या भावनेत आहे. या एकतेला मतांमध्ये परिवर्तीत करण्याची जबाबदारी आपली आहे.
तर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी भारतीय वायुसेनेने केलेल्या कारवाईचा फायदा पक्षाला होईल असे म्हटले आहे. दिवसेंदिवस भाजपाच्या बाजूने लहर वाढत चालली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केल्यानंतर देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थनात लहर बनली आहे. याचा परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीत दिसून येणार आहे. तसेच, या कारवाईमुळे कर्नाटकात येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 22 हून अधिक जागा जिंकण्यास मदत होईल, असे बी. एस. येडियुरप्पा यांनी सांगितले.