ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. १७ - जेडीयूच्या निलंबित आमदार मनोरमा देवी यांनी अखेर मंगळवारी सकाळी गया न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मनोरमा देवी यांच्या घरात मद्याच्या बाटल्या सापडल्यानंतर त्यांच्या विरोधात वॉरंट जारी करण्यात आले होते.
अटक चुकवण्यासाठी त्या पळत होत्या. मनोरमा देवींचा मुलगा रॉकी यादवने त्याच्या गाडीला ओव्हटेक केले म्हणून आदित्य सचदेव या १९ वर्षीय युवकाची गोळया झाडून हत्या केली होती. न्यायालयाचे कामकाज सुरु होण्यापूर्वी मनोरमा देवी त्यांच्या वकिलासह न्यायालयात हजर झाल्या.
आत्मसमर्पणाची त्यांची याचिका प्राधान्याने विचारात घ्यावी अशी त्यांच्या वकिलाने न्यायालयाला विनंती केली. प्रसारमाध्यमांचा ससेमिरा चुकवण्यासाठी त्या सकाळीच न्यायालयात हजर झाल्या. मनोरमा देवी या आजारी असतात त्यामुळे तुरुंगात त्यांना वैद्यकीय सुविधा देण्यात याव्यात अशी त्यांच्या वकिलाने न्यायालयाला विनंती केली.
न्यायालयाने त्यांची विनंती मान्य करत तुरुंग प्रशासनाला व्यवस्थित वैद्यकीय उपचार उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले. मनोरमा देवी यांच्या अनुग्रह पुरी येथील निवासस्थानी ११ मे रोजी पोलिसांनी मारलेल्या छाप्याच्यावेळी मद्याच्या बाटल्या सापडल्या होत्या.
बिहारमध्ये दारु बंदी लागू आहे. मनोरमा देवीवर लहान मुलाला बालमजूर म्हणून राबवल्याचाही आरोप आहे. माझ्या विरोधात राजकीय षडयंत्र रचण्यात आले असून, भाजपच्या खोटया प्रचाराने मला अडचणीत आणले आहे असे मनोरमा देवी तुरुंगात जाण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाल्या.