पंजाबमधील भाजप आणि काँग्रेस नेत्यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. काँग्रेसचे आमदार सुखपाल सिंग खैरा यांच्यानंतर आता भाजप नेते आणि पंजाबचे माजी अर्थमंत्री मनप्रीतसिंग बादल यांच्या शोधात सहा राज्यांमध्ये छापे टाकण्यात येत आहेत. मनप्रीतसिंग बादल यांच्या शोधात पंजाब पोलिसांची दक्षता पथके हिमाचल, हरियाणा, दिल्ली, उत्तराखंड आणि राजस्थानमध्ये पोहोचली आहेत.
भटिंडा येथील मालमत्तेच्या खरेदीत कथित अनियमितता केल्याप्रकरणी न्यायालयाने मंगळवारी मनप्रीतसिंग बादल यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते. पंजाब दक्षता ब्युरोने मनप्रीतसिंग बादल यांच्याविरुद्ध लुकआउट सर्कुलर (एलओसी) जारी केल्यानंतर न्यायालयाचा आदेश आला आहे. एफआयआर दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मनप्रीतसिंग बादल यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू केली. मंगळवारीही अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी आणि इतर ज्ञात ठिकाणी छापे टाकले, पण ते कुठेच सापडले नाहीत.
पंजाबच्या माजी मंत्र्याविरोधात सोमवारी लूक आऊट सर्कुलर जारी करण्यात आले आहे. या प्रकरणी मनप्रीतसिंग बादल व्यतिरिक्त भटिंडा विकास प्राधिकरणाचे (बीडीए) माजी मुख्य प्रशासक बिक्रमजीत शेरगिल, राजीव कुमार, अमनदीप सिंग, विकास अरोरा आणि पंकज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजीव कुमार, अमनदीप सिंग आणि विकास अरोरा यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, शनिवारीच पंजाब पोलिसांनी काँग्रेस नेते सुखपाल सिंग खैरा यांना 8 वर्षे जुन्या प्रकरणात गुरुवारी अटक केली. सुखपाल सिंग खैरा यांच्यावर जलालाबाद पोलिसांची कारवाई 2015 च्या फाजिल्का (पंजाब) ड्रग्स तस्करी प्रकरणाशी संबंधित आहे, ज्यामध्ये सुरक्षा यंत्रणांनी आंतरराष्ट्रीय तस्करांच्या टोळीकडून 1,800 ग्रॅम हेरॉईन, 24 सोन्याची बिस्किटे, दोन शस्त्रे, 26 काडतुसे आणि दोन पाकिस्तानी सिमकार्ड जप्त केले होते. पंजाब पोलिसांनी सुखपाल सिंग खैरा यांच्या अटकेचा या ड्रग्ज प्रकरणाशी संबंध जोडला आहे.
या नेत्यांवर गुन्हे दाखलमाजी मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी, माजी उपमुख्यमंत्री ओपी सोनी, माजी कॅबिनेट मंत्री साधूसिंग धर्मसोत, भारत भूषण आशु, विजय इंदर सिंगला, संगत सिंग गिलजियां, ब्रह्म महिंद्रा, बलबीर सिंग सिद्धू, शाम सुंदर अरोरा, गुरप्रीत सिंग कांगड आणि मनप्रीतसिंग बादल यांच्यासह प्रमुख काँग्रेस नेत्यांवर बेहिशेबी मालमत्तेचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आम आदमी पार्टी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी एकमेकांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली.