Parliament Mansoon Session : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी काँग्रेसला देशातील जनतेले नाकारल्याची टीका केली. तसेच, युपीए नाव बदलण्यावरुनही खोचक टोला लगावला. याशिवाय, काँग्रेसवाले अनेक वर्षांपासून एकच फेल प्रोडक्ट परत परत लॉन्च करतात. प्रत्येकवेळी लॉन्चिंग फेल होते, असे म्हणत राहुल गांधींवरही टीका केली.
काँग्रेसला अनेक राज्यातून हद्दपार केलेयावेळी विरोधकांच्या INDIA आघाडीवर निशाणा साधत पंतप्रधान म्हणाले की, 'काही दिवसांपूर्वी विरोधकांनी बंगळुरुमध्ये यूपीएचे यूपीएचा अंतिम संस्कार करत आनंदोत्सवही साजरा केला. मी विरोधकांबद्दल सहानुभूती व्यक्त करतो. काँग्रेसच्या गर्वाचा चक्काचूर झाला आहे. त्यांना स्थानिक पातळीची काहीच कल्पना नाही. बंगाल, ओडिशा, नागालँड, तामिळनाडू, यूपी, बिहार आणि इतर अनेक राज्यांचा काँग्रेसवर विश्वास नाही. यामुळेच तेथील जनतेने काँग्रेसला हद्दपार केले आहे.'
2028 मध्ये विरोधक अविश्वास प्रस्ताव आणतील पीएम मोदी पुढे म्हणतात, '2018 मध्ये यांनी आमच्या सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला, 2019 मध्ये आम्ही सत्ते आलोत. आता परत त्यांनी अविश्वास प्रस्ताव आणला, आम्ही पुन्हा एकदा येणार आहोत. 2028 मध्येही विरोधक पुन्हा अविश्वास प्रस्ताव आणतील, कारण विरोधकांची विचारसरणीच अविश्वासाने भरलेली आहे,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
मी शिव्यांना टॉनिक बनवतो पीएम मोदी म्हणाले की, 'विरोधी पक्षांच्या लोकांना एक गुप्त वरदान मिळाले आहे. ते ज्यांच्याबद्दल वाईट विचार करतात, त्यांचे चांगले होते. मी एक उदाहरण तुमच्यासमोर उभा आहे. 20 वर्षे झाले, ते माझे काहीही करू शकले नाहीत. तीन दिवसांपासून सभागृहात माझ्यासाठी वाईट शब्द बोलले गेले. त्यांची आवडती घोषणा आहे, मोदी तेरी कबर खुदेगी. पण, मी शिव्यांना टॉनिक बनवतो,' असंही मोदी यावेळी म्हणाले.
काँग्रेसला कुटुंबवाद आवडतो पीएम मोदी पुढे म्हणाले की, 'सगळीकडे एकाच कुटुंबाचे नाव दिसते. त्यांनी भ्रष्टाचाराशिवाय काहीही काम केले नाही. काँग्रेसकडे स्वतःचे असे काहीही नाही. निवडणूक चिन्हापासून ते कल्पनेपर्यंत सर्व काही दुसऱ्याकडून घेतले आहे. काँग्रेसची स्थापना परकीयांनी केली. विश्वासार्हता वाढवण्यासाठी काँग्रेसने राष्ट्रीय तिरंग्यासारखा ध्वज स्वीकारला, त्यांनी फायद्यासाठी गांधी आडनावही चोरले. काँग्रेसला कुटुंबवाद आवडतो. ही इंडिया आघाडी नाही, घमंडिया आघाडी आहे. त्यांच्यात प्रत्येकालाच पंतप्रधान व्हायचं आहे,' असा टोलाही मोदींनी यावेळी लगावला.
संबंधित बातमी- फिल्डिंग तुम्ही लावली अन् चौकार-षटकार इथून लागले; PM नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल