नवी दिल्ली: भारतात औषधांच्या किमती(Medicines Price) वाढणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या सर्व चर्चांवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया(Mansukh Mandaviya) यांनी महत्वाची माहिती दिली. 'अत्यावश्यक औषधांच्या किंमती केंद्र सरकारने वाढवल्या नाहीत. या औषधांच्या किंमतींवर सरकारचे नियंत्रणही नाही', असे स्पष्टीकरण मनसुख मांडवीय यांनी दिले आहे.
'औषधांच्या किमतीवर सरकारचे नियंत्रण नाही'मागील काही दिवसांपासून औषधांच्या किंमतीत वाढ होत असल्याने केंद्र सरकारवर टीका होत आहे. यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी यावर स्पष्टीकरण दिले. सोमवारी मीडियाशी संवाद साधताना ते म्हणाले की, 'सरकारने औषधांच्या किमती वाढवल्या नाहीत, यावर केंद्र सरकारचे काहीच नियंत्रण नाही. अशा औषधांच्या किंमती या घाऊक किंमत निर्देशांकावर अवलंबून असतात. जर हा निर्देशांक वर गेला तर अत्यावश्यक औषधांच्या किंमती वाढतात आणि निर्देशांक खाली गेल्यास किंमतीत घट होते.'
तुरळक वाढ होण्याची शक्यतामांडविया पुढे म्हणाले की, घाऊक निर्देशांकाशी संबंधित काही आवश्यक औषधांमध्ये आपोआप चढ-उतार दिसून येतात. या औषधांच्या किंमती फक्त काही रुपयांमध्ये आहेत. त्यामुळे यात काही वाढही झाली, तरीदेखील ती काही पैशांनीच होईल. या औषधांच्या किमती वाढवण्याबाबत सरकारची कोणतीही भूमिका नसून किमतीत वाढही केलेली नाही किंवा तशी कोणतीही योजनाही नसल्याचे त्यांनी सांगितले.
'या' औषधांचा यादीत समावेशनॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) ने अलीकडेच एप्रिलपासून अत्यावश्यक औषधांच्या किमतीत वाढ करण्यास परवानगी दिली होती. यानंत काहींनी त्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या औषधांमध्ये पॅरासिटामॉल, बॅक्टेरियाच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्या अँटीबायोटिक्स, अॅनिमियाविरोधी औषधे, जीवनसत्त्वे आणि खनिज औषधे यांचा समावेश होता.