नवी दिल्ली, दि. 29 - जगातील प्रमुख देशांमध्ये अत्याधुनिक शस्त्रास्त्र निर्मितीची स्पर्धा सुरु असताना भारताला यामध्ये एक महत्वपूर्ण यश मिळाले आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डीआरडीओने भारताचा पहिला मानवरहित रणगाडा विकसित केला आहे. 'मंत्रा' असे या रणगाडयाचे नाव आहे. मंत्रामध्ये तीन अशा गोष्टी आहेत कि, ज्यामुळे तो इतर रणगाडयांपेक्षा वेगळा ठरतो.
टेहळणी, पेरलेले सुरुंग शोधणे, अणवस्त्र आणि केमिकल हल्ल्याचा धोका असलेल्या भागामध्ये मंत्राचा वापर करता येईल. अवदीमध्ये सीव्हीआरडीईने मंत्राच्या चाचण्या घेतल्या असून, खास लष्करासाठी हा रणगाडा बनवण्यात आला आहे. निमलष्करी दलाने या वाहनामध्ये रुची दाखवली आहे. नक्षलप्रभावित भागांमध्ये हे वाहन उपयुक्त ठरेल असे निमलष्करी दलाचे मत आहे. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना श्रध्दांजली म्हणून डीआरडीओने एक प्रदर्शन आयोजित केले होते. त्या प्रदर्शनामध्ये हा रणगाडा ठेवण्यात आला होता.
मंत्राला खास मानवरहीत टेहळणी मोहिमांसाठी विकसित करण्यात आले आहे. मंत्रामधला एम सुरुंग शोधण्यासाठी आहे. एन अणवस्त्रासाठी आहे. 52 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान असलेल्या राजस्थानच्या महाजन फिल्ड फायरिंग रेंजवर या रणगाडयाच्या चाचण्या घेण्यात आल्या. तुम्ही दूर बसून हा रणगाडा ऑपरेट करु शकता. यामध्ये टेहळणी रडार, लेझर रेंज कॅमेरा आहे. ज्यामुळे तुम्ही सहज लक्ष्य हेरु शकता.
अर्जुन रणगाड्यांसाठी स्फोटकांचे संशोधनशत्रूच्या सैन्यांना धडकी भरविणाऱ्या अत्याधुनिक अशा स्वदेशी बनावटीच्या अर्जुन रणगाड्यांच्या मारक क्षमतेत वाढ करण्यासाठी पुण्याने मोलाचे योगदान दिले आहे. या रणगाड्यांसाठी अत्याधुनिक स्फोटकांचे संशोधन पुण्यातील आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट (एआरडीई) व हाय एनर्जी मटेरिअल्स रिसर्च लॅबॉरेटरी (एचईएमआरएल) या लष्करी संस्थांनी केले आहे. अर्जुन रणगाड्यांवरून या स्फोटकांची यशस्वी चाचणी ओडिशामध्ये घेण्यात आली आहे. त्या मुळे लवकरच ही स्फोटके लष्करात दाखल होण्याची शक्यता आहे. भारतीय लष्कराकडील बहुतांश रणगाडे हे परदेशी बनावटीचे आहेत. लष्कराच्या डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने (डीआरडीओ) स्वदेशी बनावटीच्या रणगाड्यांची निर्मिती सुरू केली. यापैकी एक अर्जुन रणगाडा. या रणगाड्यांसाठी वापरण्यात येणारा दारूगोळा हा इतर रणगाड्यांसारखाच असल्याने, त्याची मारक क्षमता वाढत नव्हती. अत्याधुनिक रणगाड्यांंसाठी अत्याधुनिक आणि जास्त सक्षम, जास्त मारक क्षमता असलेली स्फोटके तयार करण्यासाठी संशोधन करण्याची जबाबदारी डीआरडीओच्या अंतर्गत येणाऱ्या एआरडीई व एचईएमआरएल या संस्थांकडे सोपविण्यात आली. त्यांनी संशोधन करून अत्याधुनिक स्फोटकांची निर्मिती केली. ही स्फोटके अर्जुन रणगाड्यांच्या गरजेनुसार डिझाइन करण्यात आल्याने, त्यांची क्षमता कित्येक पटींनी वाढली आहे.