'कमल का फूल, बडी भूल' म्हणणारे मानवेंद्र सिंह काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 08:58 AM2018-10-17T08:58:02+5:302018-10-17T09:01:35+5:30
भाजपाचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंह यांचे पुत्र मानवेंद्र सिंह यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मानवेंद्र सिंह आज नवी दिल्लीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत.
जयपूर : भाजपाचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंह यांचे पुत्र मानवेंद्र सिंह यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मानवेंद्र सिंह आज नवी दिल्लीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मानवेंद्र सिंह यांच्या समवेत त्यांच्या पत्नी चित्रा सिंह आणि भाऊ भुपेंद्र सिंह हे देखील कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गेल्या महिन्यात भाजपाचे आमदार असलेल्या मानवेंद्र सिंह यांनी बारमेरमध्ये झालेल्या 'स्वाभीमान रॅली'दरम्यान आपण भाजपा सोडणार असल्याचे जाहीर केले होते. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना 'कमल का फूल, बडी भूल' असे त्यांनी म्हटले होते.
मानवेंद्र सिंह हे 2013 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या तिकीटावर बारमेर मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र, जसवंत सिंह यांना 2014 च्या लोकसभा निवडणुकीत बाडमेर मतदारसंघातून भाजपाकडून तिकीट नाकारण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी जसवंत सिंह यांचा पत्ता कट केल्याची चर्चा त्यावेळी राजस्थानच्या राजकारणात होती. तसेच, यामुळे जसवंत सिंह कुटुंबीय व वसुंधरा यांच्यात कटुता निर्माण झाली होती.
दरम्यान, मानवेंद्र सिंह यांनी भाजपा सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे पश्चिम राजस्थानमध्ये पार्टीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे भाजपाने म्हटले आहे. मानवेंद्र सिंह यांचा हा निर्णय राजकीयदृष्ट्या चुकीचा आहे. यामुळे भाजपाला मिळणारा राजपूतांच्या मतांवर कोणताही परिणाम होणार नाही, असे भाजपा नेते राजेंद्र राठोड यांनी सांगितले.
('कमल का फूल हमारी भूल थी'; मानवेंद्र सिंह यांचा भाजपाला रामराम)