नवी दिल्ली - देशाच्या नव्या राष्ट्रपतींच्या निवडीसाठी सोमवार १८ जुलै रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. तर विरोधकांनी यशवंत सिन्हा यांच्या रूपात संयुक्त उमेदवार दिला आहे. दरम्यान, द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेसह अनेक प्रादेशिक पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान, पाठिंब्याच्या बाबतीत काहीसे मागे पडलेल्या यशवंत सिन्हा यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतून माघार घ्यावी, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
राष्ट्रपती निवडणुकीबाबत प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, यशवंत सिन्हा यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतून माघार घ्यावी, अशी आमची विनंती आहे. कारण अनेक पक्षांच्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या सदस्यंनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे निश्चित केले आहे.
राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलै रोजी मतदान होणार आहे. तर् २० जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. सुरुवातीला द्रौपदी मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांच्यात अटीतटीची लढत होईल, अशी चिन्हे होती. मात्र नंतर अनेक प्रादेशिक पक्षांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिल्याने यशवंत सिन्हा मतांच्या गणितामध्ये काहीसे माघारी पडले आहेत.