नवी दिल्ली : २०२० मध्ये पाकिस्तानने जम्मू-काश्मीर आणि पंजाबशिवाय गुजरात आणि राजस्थान या राज्यांच्या सीमांवरून घुसखोरीचे अनेक प्रयत्न केल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाकडून (बीएसएफ) मिळाली आहे.
बीएसएफने संग्रहित केलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून भारतीय हद्दीत होणाऱ्या घुसखोरीच्या घटनांतही यंदा वाढ झाली आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गुजरात आणि राजस्थानच्या सीमेवरून घुसखोरीच्या घटना घडलेल्या नव्हत्या. काश्मीर सीमेवरून मात्र घुसखोरीच्या ४ घटना घडल्या हाेत्या. चकीत करणारी बाब म्हणजे, यंदा काश्मीर सीमेवरून घुसखोरीची एकच घटना घडली आहे. गुजरात आणि राजस्थान सीमेवरून यंदा ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये घुसखोरीच्या अनेक घटना घडल्या.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, भारतात अतिरेकी घुसविण्यासाठी पाकिस्तानकडून इतर मार्गांचा पर्याय शोधला जात असल्याचे या प्रकारावरून दिसून येत आहे. जम्मू, काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरात या सीमांवरून घुसखोरीच्या एकूण ११ घटना यंदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत घडल्या.