बंगळुरु - कर्नाटक सुरु असलेल्या सत्तेच्या राजकारणामध्ये काँग्रेस नेत्याकडून मोठा दावा करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बीएस येडियुरप्पा यांनी 23 मेनंतर कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकारमध्ये अस्थिरता निर्माण होईल असा इशारा दिला होता. त्यावर सोमवारी काँग्रेसचे महासचिव के. सी वेणुगोपाळ यांनी उत्तर दिलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक भाजपाचे आमदार काँग्रेसमध्ये सहभागी होतील असा दावा वेणुगोपाळ यांनी केला आहे.
के. सी वेणुगोपाळ यांनी सांगितले की, आगामी लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात काँग्रेसचे सरकार येईल असा विश्वास आहे. देशातील जनतेला परिवर्तन हवं आहे त्यामुळे 23 मेच्या निकालामध्ये सरकार बदलेलं दिसेल असं ते म्हणाले. मग 23 मेनंतर कर्नाटकात सरकार कसं अस्थिर होणार असा प्रश्न वेणुगोपाळ यांनी उपस्थित केला आहे.
तसेच आम्ही भाजपाच्या आमदारांना काँग्रेसमध्ये आणण्याचे प्रयत्न करत नाही तर 23 मेच्या निकालानंतर भाजपाचे आमदार स्वत:च्या मर्जीने काँग्रेसमध्ये सहभागी होतील त्यामुळे आम्हाला काही चिंता नाही असंही वेणुगोपाळ यांनी सांगितले. दरम्यान काँग्रेसचे कर्नाटकमधील मंत्री जमीर अहमद खान यांनी येडियुरप्पा यांना सत्तेची दिवास्वप्नं पडत आहेत. भाजपाचे जवळपास 10 आमदार काँग्रेसच्या संपर्कात आहेत असा दावा केला आहे.
कर्नाटकातील भाजपा नेते व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकात लोकसभेच्या 22 जागा जिंकल्यास भाजपाचे सरकार 24 तासांच्या आत सत्तेवर येईल असा दावा केला होता. तसेच काँग्रेस 20 आमदार विद्यमान कर्नाटकच्या सरकारवर नाराज असल्याचंही त्यांनी सांगितले होतं. देशातील लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल 23 मे रोजी लागणार आहेत.
गेल्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीसाठी कर्नाटकात एकूण 28 जागांपैकी भाजपा 17, काँग्रेस 9 आणि जेडीएसने 2 जागांवर विजय मिळवला होता. मात्र, गेल्यावर्षी बेल्लारी मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव झाला होता. त्यामुळे सध्या भाजपाकडे 16 जागा आहे. मात्र यंदा कर्नाटकमधील सत्तेवर लोकसभा निवडणुकीचा काय परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.