नवी दिल्ली - ट्रायच्या नव्या दर आदेशाने वाढलेल्या किमतीनुसार नवीन करार न करणाऱ्या केबल ऑपरेटरांचे सिग्नल कापले आहेत. त्यामुळे देशातील ४.५ कोटी टीव्ही ग्राहकांच्या पॅकमधून डिस्नी स्टार, झी आणि सोनी यांसारख्या प्रमुख ब्रॉडकास्टर्सचे चॅनल्स गायब झालेत. केबल टेलिव्हिजन कंपन्यांची शिखर संस्था 'ऑल इंडिया डिजिटल केबल फेडरेशन'ने (एआयडीसीएफ) सांगितले की, नव्या करारामुळे टीव्ही पाहण्याचा खर्च २५ ते ३५ टक्क्यांनी वाढून ग्राहकांवर बोजा पडेल, असे म्हणून केबल ऑपरेटरांनी नव्या दरासाठीच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यास नकार दिला आहे.
१५ टक्के दरवाढ एनटीओ ३० अन्वये ४ वर्षांनंतर लोकप्रिय चॅनलांच्या दरांत १५ टक्के वाढ झाली आहे. 'इंडियन ब्रॉडकास्टिंग अँड डिजिटल फाउंडेशन'ने (आयबीडीएफ) म्हटले की, ८० टक्के ऑपरेटरांनी नव्या करारावर स्वाक्षया केल्या आहेत. २० टक्के ऑपरेटर स्वाक्षऱ्यांसाठी तयार नाहीत.
ट्रायने जारी केलेल्या 'नवीन दर आदेश ३.० नुसार इंटरकनेक्ट ऑफरवर स्वाक्षऱ्या करण्यासाठी एआयडीसीएफने केबल ऑपरेटर व मल्टी सिस्टम ऑपरेटरांना नोटिसा बजावल्या होत्या. त्याकडे अनेक ऑपरेटरांनी दुर्लक्ष केले आहे.