जागांच्या वाटाघाटीतून निर्माण झालेल्या पेचानंतर राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि भाजपा-सेना युती तुटली़ आता शिवसेना, भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जात आहेत़ उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या एक दिवस अगोदर युती आणि आघाडी तुटल्याने संपूर्ण जागांवर उमेदवार शोधताना जवळपास सर्वच पक्षांची दमछाक झाली़ यातूनच उमदेवारी मिळविण्यासाठी पक्षांतराचे सत्र सुरू झाले, राजकीय घराण्यापर्यंत पोहोचले़ यातूनच अनेक कुटुंबांतच सत्तासंघर्ष सुरू झाला़ राज्यातील काही मतदारसंघांमध्ये बहिणी-बहिणी, भाऊ-बहीण, चुलते- पुतणे आणि दीर-भावजय हे निवडणुकीत आमने-सामने आले आहेत़कट्टर समर्थक बनला प्रतिस्पर्धीएकेकाळी भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक असलेले त्यांचे पुतणे धनंजय यांनी प्रत्येक निवडणुकीत मुंंडे यांना विक्रमी मतदान व्हावे यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत़ पण हेच धनंजय मुंडे आता प्रतिस्पर्धी म्हणून पंकजा यांच्यासमोर उभे आहेत़ परळी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रिंगणात उतरलेल्या धनंजय यांनी पंकजा यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे़ भाऊबंदकी आमनेसामनेउस्मानाबाद मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान आमदार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात त्यांचे चुलत बंधू राणा जगजितसिंह पाटील हे निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत़ मागील विधानसभा निवडणुकीत ओमराजे यांनी राणा जगजितसिंह यांचा पराभव केला होता़ यावेळी कोण बाजी मारतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे़ बहिणी-बहिणीत राजकीय संघर्षअमरावतीच्या तिवसा मतदारसंघातून विद्यमान आमदार यशोमती ठाकूर या रिंगणात असून, त्यांच्याविरोधात त्यांच्या भगिनी संयोगिता निंबाळकर या शिवसेनेतर्फे निवडणूक लढवत आहेत़ गतवेळी यशोमती ठाकूर यांना निवडून आणण्यासाठी जिवाचे रान करणाऱ्या संयोगिता यावेळी त्यांच्याविरोधात रिंगणात उतरल्याने लढत चुरशीची होणार आहे़ दीर-भावजय मैदानातकाँग्रेसने तिकीट न दिल्याने भाजपातर्फे उमेदवारी मिळवत माजी मंत्री संजय देवतळे हे निवडणूक रिंगणात उतरले़ त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून त्यांची भावजय डॉ़ आसावरी देवतळे या रिंगणात आहेत़ एकूणच चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा मतदारसंघात राजकीय संघर्ष उफाळणार असल्याची चिन्हे आहेत़ निलंग्यात परंपरा कायमलातूरच्या निलंगा मतदारसंघातून भाजपातर्फे संभाजी पाटील-निलंगेकर हे रिंगणात असून, त्यांच्याविरोधात त्यांचे चुलते अशोक पाटील -निलंगेकर यांनी शड्डू ठोकला आहे़ २००४ च्या निवडणुकीत आजोबाने नातवाचा पराभव केला होता़ त्यानंतर २००९च्या निवडणुकीत नातवाने आजोबांचा पराभव करीत परतफेड केली होती़ यंदाच्या निवडणुकीत चुलतेविरुद्ध पुतणे असे चित्र आहे़दीर-भावजय प्रथमच आमने-सामनेलातूर ग्रामीणमधून काँग्रेसतर्फे त्र्यंबक भिसे, तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे त्यांच्या भावजय आशा भिसे या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत़ या मतदार संघातून दोघेही प्रथमच नशीब आजमावत आहेत़