पैसे घेऊन प्रश्न विचारल्याप्रकरणी आज लोकसभेमध्ये तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. यावेळी चर्चेदरम्यान लोकसभेत विचित्र प्रकार घडला. जदयूचे खासदार गिरधारी यादव यांनी माझे प्रश्न मी नाही तर माझा पीए विचारतो, मी कधी माझे प्रश्न तयार करत नाही, हे सर्व काम माझा पीए करतो, असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासमोर सांगितले. यावर बिर्ला भडकले आणि त्यांनी कारवाई करण्याचा इशारा दिला.
मीच नाही तर, अनेक खासदार स्वत:चे प्रश्न स्वत: तयार करत नाहीत. असे फार कमी हुशार लोक असतील जे दोन तासांत रिपोर्ट वाचत असतील, असे यादव यांनी संसदेत सांगितले. मला माझा पासवर्डही माहिती नाहीय. तो माझ्या पीएकडे असतो. महुआंवरील कारवाईवरून यावेळी मी कोणताही प्रश्न विचारलेला नाहीय. माहित नाही काय होईल, असा खुलासाही गिरधारी यांनी केला.
लोकशाहीत आम्हाला घाबरविले गेले आहे. मला कॉम्प्युटरही चालविता येत नाही. मी तिसऱ्यांदा खासदार आहे, चार वेळा आमदार झालोय. म्हातारपणी मी शिकू शकतो का? या वयात तरी आता होऊ शकत नाही. ३७७ वर खूप कष्टाने प्रश्न विचारला होता. त्यापूर्वी पूर्ण प्रश्न विचारत होतो. आता माहितीच नाहीय तर नाहीय, सर्वांसाठी वेगवेगळा कायदा, भाजपा मनुस्मृती लागू करण्याची तयारी करतेय, असा आरोप गिरधारी यांनी केला.
हिरानंदानीला का नाही चौकशीला बोलवले?
उद्योजक दर्शन हिरानंदानी यांना एथिक्स समितीमध्ये एकदाही बोलविले गेले नाही. निशिकांत दुबे यांना उलटतपासणीसाठी बोलावण्यात आले. खासदारांना डावलले गेले हे दुर्दैव आहे. आम्ही समितीच्या अध्यक्षांना हिरानंदानीला बोलवा असे सांगितले होते. परंतू चर्चा काहीच नाही आणि बैठक दोन मिनिटांत संपविली. ते खासदाराला बोलवू शकतात पण व्यावसायिकाला नाही. प्रतिज्ञापत्रावर शिक्षा होऊ शकते का? पासवर्ड कधीच दिला नाही. जरी लॉगिन कुठूनही झाले तरी पासवर्ड महुआ कडेच होता, असा दावाही गिरधारी यांनी केला आहे.