नवी दिल्ली : सत्ताधारी भाजपने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधकांच्या घराणेशाहीवर जोरदार टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या विस्तारित परिवारात आता गैर-गांधी कुटुंबांतील अनेक माजी पंतप्रधान आणि उपपंतप्रधानांच्या कुटुंबातील सदस्य सामील झाले आहेत.
माजी उपपंतप्रधान देवीलाल यांचे पुत्र, हरयाणाचे मंत्री आणि अपक्ष आमदार रणजितसिंह चौटाला या यादीत सर्वात अलीकडे आलेले आहेत. हिस्सार लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळवण्यासाठी त्यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. इतरांमध्ये दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री आणि पी. व्ही. नरसिंह राव यांच्या नातेवाइकांचा समावेश आहे. नरसिंह राव यांचे पुत्र प्रभाकर राव लवकरच तेलंगणात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. राव यांचे नातू एन. व्ही. सुभाष हे आधीच भाजपमध्ये आहेत.
समाजवादी माजी पंतप्रधानांच्या कुटुंबातील काही सदस्यांनी देखील भाजपमध्ये किंवा त्याच्या मित्रपक्षांत बस्तान बसविले आहे. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे पुत्र नीरज शेखर यांनी २०१९ मध्ये समाजवादी पक्षामधून भाजपमध्ये प्रवेश केला आणि सध्या ते राज्यसभेचे खासदार आहेत.
जनता पक्षाचे दिग्गज आणि माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचे पुत्र आरएलडी संस्थापक अजित सिंह यांनी एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील दोन्ही सरकारांच्या मंत्रिमंडळात काम केले होते. गेल्या महिन्यात दिवंगत अजित सिंह यांचे पुत्र जयंत चौधरी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी एनडीएमध्ये जाण्यासाठी विरोधी इंडिया आघाडीची साथ सोडली.
लालबहादूर शास्त्रींचे नातेवाईक विविध पक्षांतलालबहादूर शास्त्री यांच्या नातेवाइकांच्या राजकीय निष्ठा वेगवेगळ्या पक्षांमध्ये विभागल्या गेल्या आहेत. त्यांचे ज्येष्ठ पुत्र हरिकृष्ण शास्त्री हे काँग्रेसच्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यांच्या इतर मुलांपैकी सुनील शास्त्री यांनी अनेक वेळा काँग्रेस आणि भाजपमध्ये प्रवेश केला. तर १९८०च्या दशकात जनता दलात राहिलेले अनिल शास्त्री अनेक वर्षांपासून काँग्रेससोबत आहेत.
कर्नाटकमध्येही एनडीएचा विस्तारमाजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील जनता दलानेही (धर्मनिरपेक्ष) कर्नाटकमध्ये एनडीएशी आघाडी केली आहे. त्यांचे पुत्र आणि माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचा विजय झाल्यास ते नरेंद्र मोदी सरकारमध्ये मंत्री होऊ शकतात.