- सुरेश भटेवरा, नवी दिल्लीबिहारचा अपवाद वगळता गतवर्षीच्या लोकसभा निवडणुकीपासून जागोजागी सातत्याने पराभव पत्करावा लागलेल्या काँग्रेस पक्षाचे ग्रह अचानक बदलले आहेत. देशातले विविध पक्ष काँग्रेसशी जवळीक साधण्यासाठी उत्सुक आहेत. यात तृणमूल आणि डावी आघाडी असे पश्चिम बंगालमध्ये पस्परांच्या विरोधातले पक्ष आहेत तर तामिळनाडूत सध्या सत्तेबाहेर असलेला द्रमुक, काँग्रेसशी निवडणूकपूर्व युती करण्यास उत्सुक आहे. दोन्ही राज्यात २0१६ च्या एप्रिल मे महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. तथापि काँग्रेसने अद्याप आपले पत्ते उघडलेले नाहीत.तामिळनाडूत आगामी विधानसभा निवडणुकीत द्रमुक ज्या पक्षांना निवडणूकपूर्व युतीचे निमंत्रण देईल, त्यात प्रामुख्याने काँग्रेसचा समावेश असेल, असे स्पष्ट संकेत या पक्षाचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांनी अलीकडेच दिले होते. गतवर्षीच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पर्यंत द्रमुक युपीएचा घटक पक्ष व काँग्रेसचा विश्वासू सहकारी होता. युपीए १ व युपीए २ मधे द्रमुक केंद्रीय सत्तेत युपीएचा घटक पक्ष होता. तथापि ए. राजा, दयानिधी मारन व कनिमोळी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यावर लोकसभेची निवडणूक उभय पक्षांनी स्वतंत्रपणे लढवली. परिणामी राज्यात दोन्ही पक्षांना एकही जागा जिंकता आली नाही. तामिळनाडूत लोकसभेच्या ३९ जागांपैकी ३७ जागा जयललितांच्या अण्णाद्रमुकने तर २ जागा एनडीएने जिंकल्या. तामिळनाडू काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ई.एलॅन्गोवन यांनी मध्यंतरी राज्यात काँग्रेस स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवेल असे सूचक विधान केले होते. तथापि करूणानिधींच्या आवाहनानंतर काँग्रेस आपली भूमिका बदलेल काय? ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. पश्चिम बंगालमधे ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस सध्या सत्तेवर आहे. २0१६ च्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी ममता बॅनर्जी पुनश्च एकदा काँग्रेसशी हातमिळवणी करू इच्छितात. याचे मुख्य कारण राज्यात काँग्रेसला हमखास मिळणारी ८ ते १0 टक्के मते विरोधकांकडे जाऊ नयेत, यासाठी ममता दीदींचे प्रयत्न सुरू आहेत. तृणमूल काँग्रेसशी हातमिळवणी करण्यास उत्सुक असल्याचे स्पष्ट संकेत संसदेच्या मान्सून अधिवेशनापासूनच जाणवत होते. हिवाळी अधिवेशनात तर नॅशनल हेरल्ड प्रकरणापासून प्रत्येक मुद्यावर तृणमूलने काँग्रेसला मनापासून साथ दिली. काँग्रेस हायकमांडलाही पश्चिम बंगालमधे तृणमूल काँग्रेसबरोबर निवडणूक समझोता करण्याची इच्छा आहे, अशी राजधानीत चर्चा आहे. तथापि पश्चिम बंगालमधे काँग्रेसचे स्थानिक नेते अधिर रंजन चौधरी, दिपा दासमुन्शी वगैरे या समझोत्याच्या कडवट विरोधात आहेत. राज्यातले डावे पक्ष काँग्रेसच्या हालचालींचा अंदाज घेत आहेत. केंद्रात युपीए १ ला डाव्या पक्षांचा बाहेरून पाठिंबा होता. अणुकराराच्या मुद्यावर डाव्यांनी युपीएचा पाठिंबा काढून घेतला. त्यानंतर प.बंगालमधे सलग ३४ वर्षे सत्तेवर असलेल्या डाव्या पक्षांचा २0११ च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूलने दारूण पराभव केला. गतवर्षी लोकसभेच्या निवडणुकीत या पराभवाची पुनरावृत्ती झाली. तेव्हापासून राज्यात काँग्रेसशी हातमिळवणी करण्याबाबत डावे उत्सुक आहेत. या संदर्भात मार्क्सवादी पक्षाचे महासचिव सिताराम येचुरी म्हणतात, प.बंगालमधे काँग्रेसबरोबर समझोता करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे मात्र या विषयावर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी जानेवारी महिन्यात पक्षाच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत सखोल चर्चा होईल. प.बंगालमधील मार्क्सवादी पक्षाच्या राज्य शाखेनेही केंद्रीय समितीच्या निर्णयानंतरच आपली भूमिका स्पष्ट करण्याचे ठरवले आहे.
भविष्यात काँग्रेसचा ‘हात’ धरायला अनेक पक्ष उत्सुक
By admin | Published: December 30, 2015 2:25 AM