अहमदाबाद: लोकसभा निवडणुकीनंतर गुजरातला गेलेल्या पंतप्रधान मोदींनी जनतेशी संवाद साधला. सहा टप्प्यातील मतदानानंतर मी भाजपाच्या 300 जागा येतील, असा विश्वास व्यक्त केला. त्यावेळी अनेकांनी माझी खिल्ली उडवली होती. मात्र माझा अंदाज खरा ठरला, असं मोदींनी त्यांच्या भाषणात म्हटलं. भाजपाला भरभरुन मतदान करत सलग दुसऱ्यांदा सर्वच्या सर्व जागांवर पक्षाला विजयी केल्याबद्दल त्यांनी गुजराती मतदारांचे आभार मानले. मोदींनी त्यांच्या गुजरात भेटीदरम्यान आईची भेट घेऊन आशीर्वादही घेतले.देशासाठी पुढील पाच वर्ष अतिशय महत्त्वाची असल्याचं मोदी म्हणाले. 'पुढील पाच वर्षांचा वापर देशातील सर्वसामान्य माणसाच्या समस्या सोडवण्यासाठी करायचा आहे. आम्हाला जागतिक स्तरावर भारताची स्थिती सुधारायची आहे,' असं मोदीनी म्हटलं. यावेळी त्यांनी सूरतमधील एका इमारतीत झालेल्या अग्नीतांडवात मृत्यूमुखी पडलेल्या मुलांच्या कुटुंबीयांबद्दल सहवेदना व्यक्त केल्या. या प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी राज्य सरकारला दिल्या. मोदींनी त्यांच्या भाषणातून गुजराती जनतेचे आभार मानले. 'गेल्या निवडणुकीत राज्यातील सर्वच्या सर्व जागांवर मतदारांनी भाजपाला विजयी केलं. यंदाही तेच घडलं. मात्र यंदाचा विजय अधिक मोठा आहे. राज्यातील 182 पैकी 173 जागांवर भाजपानं आघाडी घेतली. राज्यातील जनतेनं सकारात्मक मतदान केलं,' असं मोदी म्हणाले. 'ज्या जमिनीनं माझं पालन पोषण केलं, तिथं मी आज आलो आहे. 2014 मध्ये देशाला गुजरातच्या विकासाचं मॉडेल समजलं. 2014 मध्ये गुजरात सोडून पुढे गेलो. तुमच्या संस्कारांमुळे आजही पुढे जात आहे,' अशा शब्दांत मोदींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.