विशेष प्रतिनिधीनवी दिल्ली : विरोधी पक्षांना एक करणे व मुस्लिम मतदातारांना आपलेसे करण्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आयोजित केलेल्या रोजा-इफ्तारमध्ये माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील तथा माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्यासह जवळपास सगळेच विरोधी पक्षनेते उपस्थित होते.त्यात झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन, राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डी. पी. त्रिपाठी, तृणमूल काँग्रेसचे दिनेश त्रिवेदी, सर्व भारतीय संयुक्त गणतांत्रिक मोर्चाचे (आसम) अजमल बदरुद्दीन, बहुजन समाज पक्षाचे सतीश मिश्रा, मार्क्सवादी पक्षाचे सीताराम येचुरी, जनता दलाचे (धर्मनिरपेक्ष) दानिश अली, द्रमुकच्या कनिमोझी आणि शरद यादव यांच्यासह इतरही नेते उपस्थित होते.काँग्रेसने आयोजित केलेल्या रोजा-इफ्तारमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने मुस्लिमांनी प्रथमच सहभाग घेतला होता. पक्ष सूत्रांनी सांगितले की, भाजपकडून सॉफ्ट हिंदुत्वाचा अवलंब झाल्यावर गोंधळात पडलेल्या मुस्लिम मतदारांना रोजा-इफ्तारमधून राहुल गांधी यांनी हा संदेश द्यायचा प्रयत्न केला आहे की आम्ही अल्पसंख्यांकांना विसरलेलो नाही. शिवाय हीच बाब नमाजच्या वेळी राहुल गांधी यांनी टोपी घालून हे सिद्ध करण्याचाही प्रयत्न केला.माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे गेल्याच आठवड्यात नागपूरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात कार्यक्रमाला गेले होते. त्यामुळे निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांना काँग्रेसने रोजा-इफ्तारच्या निमित्ताने पूर्ण विराम दिला. प्रणव मुखर्जी यांच्यासोबत जेवणाच्या टेबलवर राहुल गांधी यांनी त्यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. ही चर्चा काय झाली हे समजले नाही. परंतु, तेथे उपस्थित नेत्यांनी संकेत दिले की राहुल गांधी यांनी देशातील वर्तमान परिस्थितीवर त्यांच्याशी चर्चा केली.भोजना दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदीद्वारा ‘इंडिया फिट’ बद्दल जो व्हिडियो अपलोड केला गेला तो मोठ्या चर्चेचा विषय ठरला. राहुल गांधीसह अनेक नेते त्या व्हिडिओची थट्टा करताना दिसले.
राहुल गांधींच्या इफ्तारला प्रणवदांसह अनेक उपस्थित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 5:42 AM