जयपूर : राजस्थानमध्ये २०० विधानसभा जागांसाठी ७ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकांमध्ये विद्यमान सत्ताधारी भाजपाला पुन्हा विजय मिळवणे हे सोपे असणार नाही, असे आतापर्यंतच्या जनमत चाचण्यांमधून दिसून आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या राज्यात अनेक निवडणूक प्रचारसभा घेण्याचे ठरविले आहे.११ जागा असलेल्या अल्वार जिल्ह्यात रविवारी मोदी यांची पहिली प्रचारसभा होईल. या जिल्ह्यात विद्यमान ९ भाजपा आमदारांपैकी सात जणांना या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आली आहे. येथील मुंदवारचे आमदार धर्मपाल चौधरी यांचे निधन झाल्यानंतरच्या पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव झाला होता. अजमेर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीतही भाजपाला अपयश आले होते. त्यामुळेच मोदी याच जिल्ह्यातून प्रचाराला सुरूवात करणार आहेत.मोदींच्या प्रचारसभा २६ नोव्हेंबर रोजी भिलवारा, बन्सवारा, कोटा येथे होतील. त्यानंतर २८ नोव्हेंबरला ते नागौर, भरतपूर व ३ डिसेंबरला जोधपूर येथे त्यांच्या सभा होतील. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते अशोक गेहलोत जोधपूर जिल्ह्यातील सरदारपुरामधून निवडणूक लढवत आहेत. ४ डिसेंबर रोजी हनुमानगढ, सिकर, जयपूर येथे पंतप्रधानांच्या प्रचारसभा आहेत.
काँग्रेसच्या आव्हानामुळे पंतप्रधान मोदी घेणार राजस्थानात अनेक प्रचार सभा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 5:30 AM