पुढच्या वर्षी देशामध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे. सलग दोन वेळा जिंकून पंतप्रधानपद भूषवल्यानंतर आता नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर मोदी आणि भाजपाचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी स्थापन करून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दरम्यान, देशासमोर महागाई, बेरोजगारीसह अनेक प्रश्न उभे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाबाबत जनतेच्या मनात काय भावना आहेत, याबाबत माहिती देणारा एक सर्व्हे समोर आला आहे. फ्युज रिसर्च सेंटरने केलेल्या या सर्व्हेनुसार पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजय होण्याची शक्यता आहे. १० पैकी ८ भारतीयांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अद्यापही विश्वास आहे. तसेच मागच्या काही वर्षांमध्ये जगात भारताची पत वाढली आहे, असे मत सर्वेत सहभागी झालेल्या लोकांनी मांडले आहे.
भारतामध्ये होत असलेल्या जी-२० संमेलनाच्या एक आठवडापूर्वी हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. एकूण ३० हजार ८६१ जणांशी चर्चा करून हा सर्व्हे २० फेब्रुवारी ते २२ मे २०२३ दरम्यान करण्यात आला आहे. यादरम्यान ६८ टक्के भारतीय प्रौढांनी जगभरात भारताचा प्रभाव वाढला आहे. असं म्हटलं आहे. तर ५५ टक्के लोकांनी मोदींबाबत समाधानकारक मत व्यक्त केलं आहे. तसेच पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर मोदीच पुन्हा नेतृत्व करताना दिसावेत, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
सुमारे १० पैकी ७ भारतीयांनी हल्लीच्या काही वर्षांमध्ये देशाचा जगभरातील प्रभाव वाढल्याचे म्हटले आहे. तर काही जणांनी तसं नसल्याचं मत व्यक्त केलं आहे. ज्या २३ देशांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला त्या देशांमध्ये अमेरिकेबरोबरच कॅनडा, इटली, जर्मनी, यूके, ऑस्ट्रेलिया, जपान आणि इंडोनेशिया या देशांचा समावेश आहे. येथील २८ टक्के लोकांनी जगात भारताचं महत्त्व वाढल्याचं मत व्यक्त केलं आहे. तर २३ देशांपैकी १२ देशातील ३२ टक्के लोकांनी जागतिक पातळीवर नरेंद्र मोदी हे योग्य निर्णय घेत असल्याचे सांगितले.