वॉशिंग्टन - भाजपकडे मोठे आर्थिक पाठबळ आहे. तर काँग्रेसची बँक खाती गोठविण्यात आली होती. अशा स्थितीत यंदा लोकसभा निवडणुकांत काँग्रेस पक्ष लढला व त्याने चांगले यश मिळविले. यंदा झालेल्या लोकसभा निवडणुका मुक्त वातावरणात नव्हे तर बऱ्याचशा गोष्टी नियंत्रित करून पार पडल्या होत्या असा दावा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला.
ते अमेरिकेच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी यांनी वॉशिंग्टनचे उपनगर असलेल्या व्हर्जिनियातील एका भागात तसेच जॉर्जटाऊन विद्यापीठ अशा दोन ठिकाणी सोमवारी झालेल्या कार्यक्रमात लोकांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्माण केलेली भीती यंदा भारतात झालेल्या लोकसभा निवडणूक निकालानंतर नष्ट झाली. मोदी यांच्याबद्दल संकल्पनाही विरल्या. आता या गोष्टी इतिहासजमा झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीने चांगली कामगिरी केलेली नाही. ही आघाडी विस्कळीत झाली असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला.
खटला भरण्याचा भाजपचा विचार
राहुल गांधी यांनी अमेरिकेत भारतविरोधी उद्गार काढले असल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यांच्या या वक्तव्याबद्दल खटला भरण्याचा विचार भाजप करत आहे. राहुल गांधी यांच्या उद्गारांचा केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह, किरेन रिजिजू यांनी निषेध केला आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी म्हणाले की, राहुल गांधी यांनी शीखांबद्दल अमेरिकेत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. ते चुकीच्या गोष्टी पसरवत आहेत.