अनेक वर्षांनंतर शीला दीक्षित यांच्याशिवाय मतदान केंद्रावर दिसल्या सोनिया गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2020 12:28 PM2020-02-08T12:28:45+5:302020-02-08T12:31:13+5:30
दिल्ली विधानसभेत आम आदमी पक्ष पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजप तब्बल 20 वर्षांनंतर पक्षाचा मुख्यमंत्री बसविण्यासाठी प्रयत्नशील आहे.
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत 70 विधानसभा मतदार संघासाठी आज मतदान होत आहे. सत्ताधारी आम आदमी पक्ष, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत येथे पाहायला मिळत आहे. अनेक दिग्गजांनी आपला मतदानाचा अधिकार पार पाडला. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, आणि उत्तर प्रदेश काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी मतदान केले. मात्र यावेळी सोनिया गांधी पहिल्यांदाच काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांच्याशिवाय मतदान केंद्रावर दिसल्या.
मागील अनेक वर्षांपासून दिल्लीत होणाऱ्या निवडणुकीच्या वेळी मतदानासाठी सोनिया गांधी, शीला दीक्षित यांच्यासोबत येत होत्या. गेल्यावर्षी शीला दीक्षित यांचे निधन झाले. त्यामुळे सोनिया गांधी यावेळी आपली कन्या प्रियंका गांधी यांच्यासोबत मतदान करण्यासाठी आल्या होत्या. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शीला दीक्षित यांच्यासोबतच सोनिया गांधी मतदान करण्यासाठी आल्या होत्या.
तत्पूर्वी केंद्रीमंत्री हर्षवर्धन, एस. जयशंकर आणि भाजप खासदार प्रवेश वर्मा यांच्यासह अनेक नेत्यांनी मतदान केले. दिल्ली विधानसभेत आम आदमी पक्ष पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजप तब्बल 20 वर्षांनंतर पक्षाचा मुख्यमंत्री बसविण्यासाठी प्रयत्नशील आहे. 15 वर्षे दिल्लीवर राज्य करणारा काँग्रेस पक्ष सत्तेत परतण्यासाठी प्रयत्नशील आहे.