नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर झालेल्या तासाभराच्या बैठकीनंतर काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. तसेच, ज्योतिरादित्य शिंदे समर्थक 20 आमदारांनीही राजीनामे दिले आहेत. शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस समर्थकांमध्येही नाराजीची सूर उमटला आहे. तर, पक्षातील इतर तरुण नेत्यांची नाराजी समोर येत आहे.
काँग्रेस नेते आणि हरियाणामधील आदमपूर मतदारसंघाचे आमदार कुलदीप बिश्नोई यांनी काँग्रेसला घरचा अहेर दिलाय. बिश्नोई यांनी ट्विट करुन काँग्रेस नेतृत्वाला सल्ला दिलाय. तसेच, पक्षातील युवक नेत्यांच्या नाराजीकडे लक्ष देण्याचे आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सूचवले आहे. विशेष म्हणजे, बिश्नोई यांच्या ट्विटरवर अनेकांनी लवकरच तुम्हीही पक्ष सोडा, असा सल्ला ट्विटरवरुन त्यांच्या ट्विटला दिलाय.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून जाणं हा पक्षाला मोठा झटका आहे. काँग्रेसने तरुणांना ताकद देणं गरजेचं आहे, ते दररोज मेहनत करत आहेत, त्यांना पुढे नेणं गरजेचं आहे. ज्योतिरादित्य हे काँग्रेस पक्षातील महत्त्वाचे नेते होते. नेतृत्वाने त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करायला हवा होता. यांसारखेच देशातील अनेक राज्यात बहुतांश नेते नाराज आहेत, जे काँग्रेसचे एकनिष्ठ आणि पक्षासाठी कष्ट घेत आहेत, असे बिश्नोई यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनीही तातडीनं बैठक बोलावली आहे. त्यातच सकाळी मोदी आणि शहांच्या घेतलेल्या भेटीनंतर ज्योतिरादित्य शिंदे भाजपा प्रवेश करणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. 18 वर्षांचा प्रवास मागे सोडून पुढे जाण्याची वेळ आली आहे. आता एक नवीन सुरुवात करायची आहे, असंही ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले आहेत.