नव्या संसदेमध्ये अखंड भारताच्या कलाकृतीवरून भारताचे शेजारी पाकिस्तान, नेपाळ आणि बांग्लादेशने आगपाखड सुरु केली आहे. आपले देशही भारताने आपल्या नकाशात आपले असल्याचे दाखविल्याचा आरोप या देशांनी केला आहे. यावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी एकाच वाक्य़ात जोरदार पलटवार केला आहे.
संसदेत लावलेली कलाकृती ही अखंड भारताची आहे, जी अशोक साम्राज्याच्या सीमा दर्शवित आहे. पाकिस्तानला या गोष्टी समजू शकत नाहीत, कारण त्यांच्याकडे समजण्याची कुवतच नाही, अशा शब्दांत जयशंकर यांनी सुनावले आहे.
मे महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या नव्या संसदेचे उद्घघाटन केले होते. या संसदेमध्ये एक भित्तीचित्र लावलेले आहे. याला अखंड भारताचा नकाशा म्हटले जात आहे. या नकाशात गौतम बुद्धांचे जन्मस्थळ लुंबिनीसोबतच तक्षशिला देखील दाखविण्यात आले आहे. यामध्ये प्राचीन शहरांची नावे आहेत. पुरूषपुर, सौवीर आणि उत्तराप्रस्थ देखील दाखविण्यात आले आहेत. ते सध्या पाकिस्तानचे पेशावर, सिंध आणइ बलुचिस्तान प्रांत आहेत. यामुळे पाकिस्तान चिडला आहे.
बांगलादेश, नेपाळ आणि पाकिस्तानने या नकाशावर नाराजी व्यक्त केली होती. भारताच्या संसदेत हा नकाशा पाहून आम्हाला आश्चर्य वाटत असल्याचे पाकिस्तानने म्हटले होते. भारताचे हे पाऊल विस्तारवादी विचार दर्शवते, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. तर बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने नवीन संसद भवनात बसवण्यात आलेल्या या नकाशाबाबत भारताकडून स्पष्टीकरण मागितले होते.