सुरेश भुसारी
नवी दिल्ली : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते छत्रपती संभाजी राजे कोणत्या राजकीय पक्षात जाऊन पुढील राजकीय डाव खेळणार आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आपण राजकारणात उतरणार असल्याचे मात्र त्यांनी येथे स्पष्ट केले.
राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित झालेल्या छत्रपती संभाजी राजे यांची मुदत संपली असून, आता ते राजकीय निर्णय घेण्यास मोकळे झाले आहेत. भाजपाच्या मदतीने ते राज्यसभेत पोहोचले होते; परंतु भाजपाच्या सहकार्याने पुन्हा राजकारण करण्याच्या मन:स्थितीत ते नसल्याचे समजते. त्यामुळे महाविकास आघाडीचा पर्याय त्यांनी खुला ठेवला आहे. महाविकास आघाडीसुद्धा त्यांना आपल्या घरात घेण्यासाठी उत्सुक आहे.
काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी छत्रपतींनी काँग्रेसमध्ये यावे, असे सूचक विधान केले होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी छत्रपती संभाजी राजे यांना काँग्रेस पक्षात घेण्यास काहीच हरकत नसल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले; परंतु अद्यापही निश्चित झाले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.