नवी दिल्ली - महाराष्ट्रात सुरू झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनाने आता उग्र रूप धारण केल्याने राज्यात आणि केंद्रात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या चिंतेत वाढ झाली आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक बोलावली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत या बैठकीमध्ये भाजपाचे राष्ट्रीय संघटनमंत्री रामलाल हेसुद्धा उपस्थित राहणार आहेत.
नोव्हेंबरअखेर आरक्षण; ‘मेगाभरती’ला स्थगिती
दरम्यान, काहीही झाले, तरी उशिरात उशिरा म्हणजे येत्या नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत न्यायालयात टिकू शकेल, अशा पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण देण्याची सर्व वैधानिक प्रक्रिया पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी राज्यातील जनतेला संबोधित करताना दिली होती.. मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत राज्य सरकारने या आधी जाहीर केलेली ६८ हजार रिक्त पदे भरण्यासाठीची ‘मेगाभरती’ सुरू केली जाणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.‘संयमाचा अंत पाहू नका’, ‘जो प्राण देऊ शकतो, तो प्राण घेऊही शकतो’ आणि ‘द्यायचे नसेल तर स्पष्टपणे नाही सांगा आणि होणारे परिणाम भोगायला तयार राहा’ अशा धमकीवजा आव्हानात्मक भाषेत मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांच्या पुण्यात झालेल्या परिषदेत प्रक्षोभक इशारा दिला गेल्यानंतर काही तासांतच मुख्यमंत्र्यांनी ‘दूरदर्शन’च्या ‘सह्याद्री’ वाहिनीवरून राज्यातील जनतेशी थेट संवाद साधताना वरील प्रमाणे ग्वाही दिली. मेगाभरतीत कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, कोणाच्याही नोकरीच्या संधी हिरावून घेतल्या जाणार नाहीत यासाठी सरकार उचित पावले सरकार उचलत आहे, यावर सर्वांनी विश्वास ठेवायला हवा, असे ते म्हणाले.