- गणेश देवकर।
त्रिपुरामध्ये भाजपाने शून्यातून थेट ४४ जागांची गरुडझेप घेतली. पक्षाच्या खात्यात स्वबळावर सत्ता असणारे आणखी एक राज्य जमा झाले. ही किमया साकारणारे विजयाचे शिल्पकार आहेत मुंबईचे सुनील देवधर. ५२ वर्षांचे देवधर अविवाहित असून ते अनेक वर्षे रा. स्व. संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम करीत आहेत.त्यांचा जन्म पुण्याचा. ज्येष्ठ व अभ्यासू पत्रकार विसूभाऊ देवधर यांचे ते पुत्र. मुंबईत अंधेरीमध्ये त्यांचे घर होते. सुनील यांनी एम. एस्सी.पर्यंत शिक्षण घेतले आहे. बी. एड. केल्यानंतर तीन वर्षे शिक्षकीही केली आणि १९९१ साली संघ कार्याला वाहून घेतले.मेघालयमध्ये सलग नऊ वर्षांच्या काळात त्यांनी खासी व जयंतिया या जमातींमध्ये संघाच्या कामाचा विस्तार केला. या काळात त्यांची ईशान्येतील राज्यांशी नाळ जुळली. ते १९९९ ते २००३ मध्ये महाराष्ट्रात आले. ईशान्येतील राज्यांत शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याने तेथील मुलांना शिक्षणासाठीअन्य राज्यांत पाठवण्याचे काम त्यांनी सुरू केले. त्यासाठी त्यांनी ‘माय होम’ ही संस्था २००५ मध्ये सुरू केली. ती आज देशभर काम करीत आहे. या मुलांच्या राहण्याची सोय व्हावी म्हणून छात्रावास सुरू करण्यात आले.नितीन गडकरी भाजपाध्यक्ष असताना २०१० साली देवधर यांच्याकडे ईशान्य भारताची जबाबदारी सोपवण्यात आली. तेव्हापासून ते भाजपामध्ये खºया अर्थाने सक्रिय झाले. अमित शहा यांनीही त्यांना ते काम सुरू ठेवण्यास सांगितले. वाराणसीमधून नरेंद्र मोदी निवडणूक लढवत असताना तेथील प्रचाराची मुख्य सूत्रे सुनील देवधर यांच्याकडेच होती.या विधानसभा निवडणुकांच्या आधी त्रिपुरातील डावे पक्ष, काँग्रेस व तृणमूल काँग्रेसमधील अनेक नेते भाजपाच्या तंबूत आले. त्यातही देवधर यांनी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.शिकले स्थानिक भाषात्रिपुरामध्ये प्रत्येक बूथपर्यंत कार्यकर्त्यांची बांधणी करण्यात सुनील यांनी जातीने लक्ष घातले. प्रत्येक बुथमागे १० जणांची टीम तयार केली. त्यामुळेच भाजपाला घवघवीत यश मिळाले. ईशान्येतील राज्यांत काम करणे फारच आव्हानात्मक होते. कामात गती यावी यासाठी देवधर यांनी तिथे स्थानिक जमातींच्या भाषा शिकून घेतल्या. मेघालयातील खासी तसेच गारो जमातींच्या लोकांसोबत ते त्यांच्या बोलीतून बोलतात. यामुळेच देवधर यांच्याबद्दल स्थानिकांना आस्था वाटते. देवधर सफाईदारपणे बंगालीही बोलतात.