नवी दिल्ली : देशातील राजकारणावर उपरोधिक भाष्य करणारा, मराठी दिग्दर्शक अमित मसुरकर यांचा ‘न्यूटन’ हा हिंदी चित्रपट आॅस्कर पुरस्कारांच्या शर्यतीत दाखल झाला आहे. देशभरात शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर समीक्षकांकडून त्याची स्तुती होत आहे. याआधी मराठी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा ‘लगान’ चित्रपटही आॅस्करपर्यंत पोहोचला होता.‘न्यूटन’ला आता आॅस्करसाठी एंजेलिना जोली यांच्या ‘फर्स्ट दे किल्ड माय फादर’, पाकिस्तानच्या ‘सावन’, स्वीडनच्या ‘द स्क्वेअर’, जर्मनीच्या ‘इन द फेड’ आणि चिलीच्या ‘ए फंटास्टिक वूमेन’ यांच्याशी सामना करावा लागेल. या चित्रपटात राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, रघुवीर यादव, अंजली पाटील आणि संजय मिश्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तेलुगु निर्माता सी. व्ही. रेड्डी यांच्या अध्यक्षतेखालील फिल्म फेडरेशन आॅफ इंडियाने (एफएफआय) या चित्रपटाची निवड केली आहे.एफएफआयचे महासचिव सुप्रण सेन यांनी सांगितले की, आॅस्करसाठी भारताकडून २६ चित्रपटांतून या चित्रपटाची विदेशी भाषा श्रेणीसाठी निवड झाली आहे. तर, या निवडीने आम्ही आनंदात असून, आमच्या टीमसाठी हा दुहेरी उत्सव असल्याचे दिग्दर्शक मसुरकर यांनी सांगितले.ते म्हणाले की, चित्रपट आजच प्रदर्शित झाला असून, आमचा आनंद द्विगुणित झाला आहे.काय आहे कथानक?या चित्रपटाचे कथानक एका प्रामाणिक निवडणूक अधिकाºयाभोवती फिरते. छत्तीसगढच्या नक्षलप्रभावित भागात एका गावात मुक्त आणि निष्पक्ष निवडणूक घेण्याचा या अधिकाºयाचा प्रयत्न आहे. या चित्रपटात एका सैन्य अधिकाºयाची भूमिका साकारणारे त्रिपाठी म्हणाले की, या निवडीने आम्ही अतिशय आनंदी आहोत. आमच्या प्रतिभेची दखल घेतली गेल्याचे समाधान आहे. आमच्या देशातील स्वतंत्र वाटेवरच्या चित्रपटाचा हा विजय आहे.
मराठी दिग्दर्शकाचा ‘न्यूटन’ आॅस्करमध्ये, देशातील राजकारणावर उपरोधिक भाष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 4:07 AM