मुंबई - हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यात भूस्खलनामुळे नऊ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, किन्नौर जिल्ह्यात बटसेरीच्या गुंसा जवळ छितकुलहून सांगलाकडे जाणारी पर्यटकांची गाडी भूस्खलनात सापडली. यात गाडीवर मोठ-मोठे दगड पडून नऊ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये, एका नेव्ही अधिकाऱ्याचेही निधन झाले आहे. अमोघ बापट असं या अधिकाऱ्याचं नाव असून ते नेव्हीमध्ये लेफ्टनंट होते. दरम्यान, या दुर्घटनेत महाराष्ट्रातील एका नागरिकालाही आपला जीव गमवावा लागला आहे.
भूस्खलनामुळे गावासाठी बास्पा नदीवर तयार करण्यात आलेला कोरोडो पूलही तुटला आहे. यामुळे गावाचा संपर्कही तुटला आहे. दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. त्यामध्ये, 9 जणांचा मृत्यू झाला असून 4 राजस्थानचे, दोन छत्तीसगढचे एक दिल्ली आणि एक महाराष्ट्राचा रहिवाशी आहे. तर, एकाची अद्याप ओळख पटली नाही. मृतांमध्ये नेव्हीतील लेफ्टनंट अमोघ बापट यांचा मृत्यू झाला आहे. अमोघचे कुटुंब छत्तीसगडमध्ये वास्तव्याला असून त्याचं पोस्टिंग अंदमान-निकोबार बेटांवर होतं.
अमोघ बापट हे अंदमानमध्ये तैनात असून ते सध्या छत्तीसगढचे रहिवाशी आहेत. तीन दिवसांपूर्वीचे ते सुट्टी घेऊन कोरोबा या मूळगावी आले होते, तेथून आपले मित्र सतिश कटवार यांच्यासमवेत शिमला फिरण्यासाठी गेले होते. दुर्दैवाने या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू आणि त्यांचे मित्र सतिश यांचाही मृत्यू झाला आहे. अमोघ यांचे वडिल छत्तीसगढमधील विद्युत वितरण विभागात इंजिनिअर आहेत. 4 वर्षांपूर्वी ते नेव्हीत भरती झाले होते, त्यानंतर 9 जुलै रोजी त्यांना प्रमोशनही मिळाले होते.
खबरदारी घेण्याचे आवाहन
मिळालेल्या माहितीनुसार, भूस्खलनासह पहाडावरून मोठ-मोठे दगड पडल्याने अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. तथापि, पाऊस सुरूच असल्याने प्रशासनाने पर्यटक आणि स्थानिक लोकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले. लोकांना नदी आणि नाल्यांपासून दूर राहण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, उपायुक्त नीरज कुमार म्हणाले, ढगफुटीमुळे खराब झालेला रस्ता पूर्ववत करण्यात येत आहे.
किन्नौरमधील घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे चमू घटनास्थळी पोहोचले. काँग्रेस आमदार जगत सिंह नेगी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाडांवरून सातत्याने दगड पडत आहेत. यामुळे रेस्क्यूत अडचण येत होती. तसेच, जखमींना रुग्णालयात हलविण्यासाठी सरकारकडे हेलिकॉप्टरचीही मागणी करण्यात आली. किन्नौरचे डीसी आबिद हुसैन सादिक, एसपी एसआर राणा हेही घटनास्थळी दाखल होते.