Marathi Sahitya Sammelan 2025: नवी दिल्ली येथे ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं आहे. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ.तारा भवाळकर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आणि प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे शेजारी बसल्याचे पाहायला मिळालं. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना खुर्चीत बसण्यासाठी मदत केल्याचे पाहायला मिळालं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या कृतीनंतर उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवत त्यांचे कौतुक केलं. पंतप्रधान मोदींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्षांच्या नेत्यांवर कितीही टीका करत असले तरी कधी कोणाचा आदर करावा हे ते विसरत नाहीत. याचेच उदाहरण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटनावेळी पाहायला मिळालं. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी शरद पवारांसाठी आधार बनले आणि त्यांना खुर्चीला धरून बसवले. एवढेच नाही तर खुद्द पंतप्रधानांनी बाटली उघडून शरद पवारांसाठी ग्लासात पाणी देखील दिले. हे पाहून उपस्थित लोकांना टाळ्यांचा कडकडाट केला. पंतप्रधान मोदींच्या या शैलीने सर्वांची मने जिंकली.
भाषण संपल्यानंतर शरद पवार हे त्यांचे आसन असलेल्या ठिकाणी बसण्यासाठी आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उभे राहून शरद पवार यांची खुर्ची धरुन ठेवली जेणेकरुन त्यांना व्यवस्थित बसता येईल. जो पर्यंत शरद पवार खुर्चीवर बसले नाहीत तोपर्यंत पंतप्रधान मोदी उभे होते. त्यानंतर खाली बसून पंतप्रधान मोदींनी शरद पवार यांच्यासाठी ग्लासात पाणी ओतलं आणि तो पुढे केला. यावेळी समालोचन करणाऱ्यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृतीचे कौतुक केले.
शरद पवारांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार
"अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशाच्या राजधानीत दुसऱ्यांदा होत असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित आहेत याचा मला आनंद आहे. सर्वांनी एका गोष्टीचा पाठपुरावा केला आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी भूमिका बजावली याबाबत महाराष्ट्रातील जनतेच्यावतीने मी त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो. १९५४ साली पहिल्यांदा दिल्लीत मराठी साहित्य संमेलन झालं. तेव्हा पंडिच नेहरु यांनी संमेलनाचं उद्घाटन केलं होतं," असं शरद पवार यांनी म्हटलं.