राजेश पाणूरकर, घुमान (संत नामदेवनगरी) -संत नामदेवांमुळे मराठी-पंजाबी सेतू बांधला गेला आणि दोन प्रदेशांचे लोक भक्तीच्या भावबंधात बांधले गेले. पण, हा प्रवास संत नामदेवांपुरताच नव्हता. हा अनुबंध आजही कायम आहे. घुमानपासून जवळपास पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या संत नामदेव गुरुद्वारात जालन्याचे संत नारायणदास महाराज तब्बल ४० वर्षापासून सेवा देत आहेत. संत नारायणदास महाराज मूळचे सायगावचे (जालना). बालपणापासून परमार्थाकडे ओढा असल्याने पारमार्थिक शिक्षणासाठी ते आळंदीला आले. नाशिक आणि पुणे परिसरात १९६९ ते ७२ या काळात गावोगावी कीर्तन, प्रवचन करुन भक्तीमार्गाचा प्रसार केला. त्यानंतर पंढरपुरात काही काळाचे वास्तव्य झाले. घुमानला संत नामदेव २० वर्षे थांबले होते, हे त्यांना कळले. येथे संत नामदेवांनी केलेल्या कार्याने प्रभावित होऊन त्यांनी प्राध्यापकाची नोकरी सोडली आणि संत नामदेवांचे काम पुढे नेण्याचा संकल्प केला. घुमानपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या भटिवाल या गावी संत नामदेवांनी एका गुहेत बसून तपश्चर्या केली. तेथे १९७२ साली छोटेसे मंदिर होते. संत नारायणदास महाराज यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा संकल्प केला आणि येथेच ते स्थायिक झाले.
नामदेवांच्या गुरुद्वारात मराठी सेवा
By admin | Published: April 06, 2015 2:52 AM