ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7- 64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर पुन्हा एकदा मराठी चित्रपटांनी मोहोर उमटवली आहे. कासव या मराठी सिनेमाला सुवर्णकमळाचा मान मिळाला आहे. दशक्रीया चित्रपटला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला तसेच व्हेंटिलेटरचे दिग्दर्शक राजेश मापुस्कर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. व्हेंटिलेटरला चार पुरस्कार मिळाले.
अभिनेता अक्षय कुमारला रुस्तममधल्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पिंक हा सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला तर, सोनम कपूरची मुख्य भूमिका असलेल्या नीरजा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला. दंगलमधल्या झायरा वसीमला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. अजय देवगणच्या शिवाय चित्रपटाला स्पेशल चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला.
अन्य पुरस्कारांच्या तुलनेत राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे एक वेगळे महत्व आहे. चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळणे हा एक सन्मान असतो. मागच्या काहीवर्षात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी सातत्याने बाजी मारली आहे.
व्हेंटिलेटर प्रियांका चोप्राचा पहिला मराठी सिनेमा
आज जाहीर झालेल्या 64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये व्हेंटिलेटर या मराठी सिनेमाने दमदार कामगिरी केली. व्हेंटिलेटर हा बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने निर्मिती केलेला पहिला मराठी सिनेमा आहे. या चित्रपटात प्रियांकाने छोटीशी भूमिकाही केली आहे. व्हेंटिलेटरला एकूण चार पुरस्कार मिळाले. राजेश मापुस्कर यांना व्हेंटिलेटरसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला तसेच सर्वोत्कृष्ट संकलन, व्हिडिओ रेकॉर्डिंग, साऊंड मिक्सिंगचेही पुरस्कार या चित्रपटाला मिळाले.
कासवला सुवर्णकमळ
कासव या मराठी सिनेमाने सुवर्णकमळाचा मान मिळवला. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. अजूनही हा सिनेमा प्रदर्शित झालेला नाही.
या चित्रपटांना मिळाले राष्ट्रीय पुरस्कार
- सर्वोत्कृष्ट चित्रपट - कासव (सुवर्णकमळ)
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - राजेश मापुस्कर (व्हेंटिलेटर)
- सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - दशक्रिया
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – मनोज जोशी ( दशक्रिया)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – झायरा वासिम ( दंगल )
- सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - नीरजा
- सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयावरील चित्रपट - पिंक
- सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्टस - शिवाय
- सर्वोत्कृष्ट व्हिडिओ रेकॉर्डिंग - व्हेंटिलेटर
- साऊंड मिक्सिंग – व्हेंटिलेटर
- सर्वोत्कृष्ट संकलन – व्हेंटिलेटर
- सर्वोत्कृष्ट वेशभूषा – सायकल
- फिल्म फ्रेंडली राज्य - उत्तरप्रदेश
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - सुरवी (मिनामिन्नुन्गू)
- बेस्ट कॉस्च्युम डिझायनर - सायकल
- फिचर फिल्म स्पेशल मेन्शन
कडवी हवा
मुक्तीभवन
- सर्वोत्कृष्ट बालचित्रपट- धनक, नागेश कुकनूर
- सर्वोत्कृष्ट गायक - सुंदरा अय्यर, जोकर (तामिळ)